500 रुपयांची स्टार चिन्ह असलेली नोट खोटी की खरी? RBI ने केलं स्पष्ट

बिझनेसनामा ऑनलाईन । आजकाल सोशल मीडियावर बऱ्याच फेक पोस्ट वायरल होत असतात. त्याचप्रकारे बऱ्याच अशा पोस्ट पैशांसंबंधीत आपल्याला समजतात. ज्यामुळे आपण घाबरून जातो. अशीच एक पोस्ट गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहे. या पोस्टमध्ये सांगण्यात येत आहे की, मार्केटमध्ये 500 रुपयांची एक नकली नोट व्हायरल होत आहे. या नोटवरील नंबरमध्ये स्टार देण्यात आलेला आहे. आता ही पोस्ट खरी की खोटी? नेमकं खरं काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत.

काय आहे व्हायरल मेसेज ?

प्रत्येक नोट ओळखण्यासाठी आरबीआय नोटवर एक सिरीयल नंबर लिहिते. सोशल मीडियावर या सिरीयल नंबर मध्ये स्टार असलेली नोट मार्केटमध्ये आहे. आणि ही नोट नकली असल्याचा दावा या व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आला आहे. बऱ्याच लोकांना अशा नोट मिळाल्या. या नोटा बँकांमध्ये परत करण्यासाठी देखील लोक गेलेत. या पोस्ट ची सत्यता तपासताना यामागील खरं सत्य समोर आले आहे. ही पोस्ट पूर्णपणे बनावट असून मार्केटमध्ये असलेल्या या स्टार वाल्या नोटा नकली नसून खऱ्याच आहेत.

RBI ने दिले स्पष्टीकरण –

स्टार चिन्ह असलेली 500 रुपयांची नोट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर RBI ने स्पष्टता दिली आहे. आरबीआयने जारी केलेल्या निवेदनात म्हंटल आहे कि, चुकीच्या पद्धतीने छापलेल्या नोटेच्या जागी जारी करण्यात आलेल्या नोटेवरील नंबर पॅनेलमध्ये स्टार चिन्ह टाकण्यात आलं आहे. हे चिन्ह पाहून काही लोकांनी त्याची तुलना खोट्या नोटेशी केली आहे परंतु या मध्ये काहीही तथ्य नाही. या नोटाही खऱ्या नोटाच आहेत असं RBI ने सांगितलं. नोटेवरील स्टार चिन्ह फक्त हेच दाखवत ही सदर नोट दुसऱ्यांदा प्रिंट केलेली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे की, अनुक्रमांक असलेल्या नोटांच्या बंडलमध्ये चुकीच्या पद्धतीने छापलेल्या नोटांऐवजी स्टार चिन्ह असलेल्या नोटा दिल्या जातात. हे स्टारची खूण नोटची संख्या आणि त्यापूर्वी प्रविष्ट करावयाची अक्षरे यांच्यामध्ये ठेवली जाते.