5G Data Services : जिओ आणि एरटेलची मोफत 5G सेवा बंद होणार; वापरकर्त्यांना अधिक किंमत मोजावी लागण्याची शक्यता

5G Data Services : सध्या देशात काही भागांमध्ये 5G नेटवर्कची दमदार सुरुवात झालेली आहे. 5G सेवेत इंटरनेटची स्पीड जलद असल्यामुळे अनेक लोकांना जास्ती वेळ न दवडता कन्टेन्ट डाऊनलोड करणे, व्हिडिओ स्ट्रीमिंग, अखंड व्हिडिओ कॉल आणि अनलिमिटेड कनेक्टिव्हिटीचा पुरेपूर वापर करता येतो. जिओ (Jio) आणि एअरटेल (Airtel) या दोन टेलिकॉम कंपन्यांकडून देशात सर्वात पहिल्यांदा 5G सेवा सुरू करण्यात आली होती, मात्र या दोन्ही कंपन्यांनी अजूनही 5G सेवांच्या प्लॅन्सची घोषणा केलेली नाही. आत्ता जरी तुम्ही 5G चे वापरकर्ते असलात तरीही तुम्ही केवळ 5G स्पीड नेटवर्कचा लाभ घेत आहात. जिओ आणि एअरटेल ह्या दोन्ही कंपन्या जवळपास एक वर्षाहून अधिक काळ ग्राहकांना मोफत दरात 5G डेटा पुरवत आहेत. मात्र आता लवकरच मिळणारी मोफत 5G सेवा बंद होणार असल्याने या नवीन वर्षात ग्राहकांना 5G डेटा वापरण्यासाठी 5 ते 10 टक्के जास्ती किंमत मोजावी लागणार आहे.

जिओ आणि एअरटेल करणार मोफत सेवा बंद: (5G Data Services)

5G इंटरनेट सेवा ही 4G आणि 3G इंटरनेट सेवेच्या तुलनेत अधिक जलद असल्याने जिओ आणि एअरटेल कंपन्यांनी सुरु केलेल्या नवीन नेटवर्क सेवेचे फायदे 4G च्या तुलनेत अधिक आहेत, परिणामी आता कंपन्यांचे नवीन 5G रिचार्ज प्लॅन्स(Recharge Plans) 5 ते 10 टक्के जास्त महाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कंपन्यांनी 5G मध्ये केलेली गुंतवणूक पाहता या दोन्ही टेलिकॉम कंपन्या त्यांच्या भांडवलावरील रिटर्न ऑफ कॅपिटल एम्प्लॉईड (ROCE) सुधारण्यासाठी वर्ष 2024 च्या सप्टेंबर महिन्याच्या तिमाहीत रिचार्ज प्लॅनमध्ये 20 टक्क्यांची वाढ करू शकतात. कंपन्यांकडून अद्याप कोणतेही अधिकृत घोषणा झाली नसली, तरीही उद्योग तज्ञांनी व्यक्त केलेल्या या शक्यतेवरून आपण दरवाढीसाठी तयार राहिलं पाहिजे.

जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्यांचे मिळून आत्ताच्या घडीला देशभरात 125 दशलक्ष ग्राहक आहेत आणि या सर्व ग्राहकांना लवकरच 5 ते 10 टक्क्यांपर्यंत जास्ती खर्च करून 5G सेवांचा वापर करावा लागू शकतो. 5G रिचार्ज प्लॅनमध्ये 4G प्लॅनच्या तुलनेत 30 टक्के जास्त इंटरनेट डेटा दिला जाण्याचे शक्यता आहे. सध्या साधारण मोबाईल रिचार्ज मध्ये 4G मोबाईल रिचार्जसाठी 1.5GB ते 3GB प्रति दिवस डेटा प्लॅन दिला जातो, मात्र 5G प्लॅनमध्ये 2GB ते 4GB प्रतिदिन डेटा दिला जाईल असे काही बाजारी तज्ञांचे मत आहे म्हणूनच नवीन मोबाईल 5G रिचार्ज प्लॅन्सच्या किमती(5G Data Services) देखील 4G प्लॅन्सच्या तुलनेत जास्त असतील.