बिझनेसनामा ऑनलाईन । भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांचा अदानी समूह हा देशातील सर्वात मोठा बंदरे आणि एअरपोर्ट ऑपरेटर आहे. बंदरे आणि विमानतळ क्षेत्रात दमदार कामगिरी केल्यानंतर आता अदानी समूहाने रेल्वे सेक्टरमध्ये आपलं पाऊल टाकलं आहे. अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्राईजेस ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म खरेदी करण्याच्या तयारीत आहे.
अदानी एंटरप्रायझेस स्टार्क एंटरप्रायझेस (SEPL) मधील 100% हिस्सा खरेदी करणार आहे. स्टार्क एंटरप्रायझेस ऑनलाइन ट्रेन बुकिंगसाठी ट्रेनमॅन प्लॅटफॉर्म चालवते. हा करार किती रुपयांचा आहे याबाबत अजून तरी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु या करारांतर्गत ट्रेनमॅन आता अदानी ग्रुपची उपकंपनी असलेल्या अदानी डिजिटल लॅबचा एक भाग बनेल. खरं तर ऑनलाइन ट्रेन तिकीट बुकिंगमध्ये सरकारी कंपनी असलेल्या IRCTC ची मक्तेदारी आहे. परंतु अनेक ट्रॅव्हल आणि टूर ऑपरेटर वेबसाईट त्यांच्या पेजवरुन तिकिट बुकिंगची सेवा देत असतात.
ट्रेनमॅन काय आहे ?
गुरुग्राम येथील स्टार्क एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड (SEPL) कंपनी ट्रेनमॅन ही IRCTC अधिकृत ऑनलाइन ट्रेन तिकीट बुकिंग स्टार्टअप आहे. SEPL ची स्थापना विनीत चिरानिया आणि करण कुमार यांनी केली होती. कंपनीने नुकतेच गुडवॉटर कॅपिटल, हेम एंजल्स आणि इतरांसह यूएस गुंतवणूकदारांच्या संघाकडून $1 दशलक्ष निधी उभारला आहे.