Agarbatti Business । अगरबत्ती हा एक भारतीय भाषिक शब्द आहे ज्याला जगभरात Incense Sticks म्हणून संबोधलं जातं आणि नावाप्रमाणे ह्या सुमारे ८” ते १२” लांबीच्या बांबूच्या पातळ लांब काड्या आहेत ज्या सुगंधित फुलांच्या नैसर्गिक पेस्टने किंवा सुवासिक लाकडाच्या सुगंधी पेस्टने झाकल्या जातात. अगरबत्ती उत्पादन व्यवसायात फायदा होण्याची मोठी क्षमता आहे कारण त्याला मागणी ही नेहमीच जास्त असते आणि उत्सव किंवा सणांच्या वेळी तर ती अजून वाढते. ९० हून अधिक देशांमध्ये अगरबत्ती वापरली जाते. भारत हा एकमेव देश आहे जो या अगरबत्ती तयार करतो आणि जगभरातील सर्व राष्ट्रांच्या मागण्या पूर्ण करतो. त्यामुळे अगरबत्ती तयार करण्याचा व्यवसाय सुरु केल्यास मोठा आर्थिक नफा मिळू शकतो.
घरबसल्या अगरबत्तीचा व्यवसाय कसा सुरू करायचा हा प्रश्न पडत असेल तर सर्व प्रश्नांची उत्तरे इथे दिलेली आहेत.
1) प्रारंभिक नियोजन टप्पा
अगरबत्ती उत्पादनाचा व्यवसाय (Agarbatti Business) चांगलाच किफायतशीर आहे. काही लहान यंत्रसामग्री आणि उपकरणांसह, कोणीही हा व्यवसाय घरबसल्या सुरू करू शकतो. अगरबत्ती बनवण्याच्या व्यवसायाची व्याप्ती वैयक्तिक आणि अगरबत्ती उत्पादन युनिटच्या उत्पादन क्षमतेवर अवलंबून असते. बाजारातील अगरबत्तीच्या मागणीवरही ते अवलंबून आहे उत्सवाच्या काळात ही चांगलीच वाढते. केवळ भारतीय बाजारपेठेतच नाही, तर इतर आशियाई देशांमध्ये अगरबत्त्या निर्यात ( Export) केल्या जाऊ शकतात, भारताने २०१७-१८ मध्ये जपान आणि चीनसारख्या अनेक देशांमध्ये ५०० कोटींहून अधिक अगरबत्तींची निर्यात केली आहे. या व्यवसायासाठी कमी दर्जाचे तंत्रज्ञान आवश्यक आहे आणि हा एक निर्यात केंद्रित ( Export Oriented) उत्पादन उद्योग आहे. त्यामुळे, अगरबत्ती बनवण्यासाठी लागणारी सुरुवातीची गुंतवणूक खूपच कमी असते. अगरबत्त्यांसाठी GST सुरुवातीला १२% होता, नंतर तो कमी होत ५% झाला.
2)अगरबत्ती बनवण्याच्या व्यवसायासाठी वेगवेगळे परवाने आवश्यक आहे
अगरबत्ती बनवण्याच्या व्यवसायाच्या (Agarbatti Business) परवानगीसाठी आवश्यक असलेल्या अटी किंवा कागदपत्रे राज्यानुसार बदलू शकतात; परिणामी, अगरबत्ती चालविण्याच्या परवान्यासंदर्भात राज्य नियम तपासण्याचा सल्ला दिला जातो.
१) कंपनी नोंदणी: अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्याची ही पहिली पायरी आहे. सुरुवात करण्यासाठी एखाद्याने त्यांचा व्यवसाय कंपनी किंवा मालकी किंवा आरओसी कंपनी म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे.
२) GST Registration: GST नोंदणी प्रत्येक व्यवसाय धारकासाठी अनिवार्य आहे. यशस्वी नोंदणीवर, एखाद्याला त्याच्या वस्तू किंवा सेवांच्या विक्रीसाठी एक GST क्रमांक मिळतो.
३) EPF Registration :एखाद्या उत्पादन युनिटमध्ये २० पेक्षा जास्त कर्मचारी असल्यासच ही नोंदणी आवश्यक आहे.
४)ESI Registration: कर्मचारी राज्य विमा किंवा ESI मध्ये १० पेक्षा जास्त कर्मचारी असल्यास ही नोंदणी करावी लागते.
५) Trade licence: व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे आवश्यक आहे. स्थानिक प्राधिकरणाकडून( local authorities ) मिळवले जाते.
६). SSI Registration: SSI युनिट असलेल्यांसाठी या परवान्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.
७) प्रदूषण प्रमाणपत्र: हे प्रमाणपत्र एखाद्याला उत्पादन युनिट असलेल्या जागेच्या तपासणीद्वारे मिळते. हे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जारी केल्यानंतर एखाद्याला व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात येते.
८) कारखाना परवाना: मोठ्या प्रमाणात उत्पादन करणाऱ्या व्यावसायिक युनिट्सकडे एनओसी आणि कारखाना परवाना असला पाहिजे.
3)अगरबत्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची यादी:
१. सुगंधी घटक
२. नैसर्गिक सुगंधी तेल – केवळ नैसर्गिक
३. बांबूच्या काड्या: ८” ते १२” इंचा पर्यंतच्या बांबूच्या काड्या आवश्यक आहेत
४.पॅकिंग मटेरियल: वापरलेले पॅकिंग मटेरिअल हवाबंद असले पाहिजे ज्यामुळे अगरबत्तीचा सुगंध जपला जातो
वेगवेगळ्या रंगाची पावडर: अगरबत्ती आकर्षक दिसण्यासाठी वेगवेगळ्या रंगाची पावडर वापरता येते.( Charcoal Powder, Nargis Powder, Crude Powder etc)
अनेक अगरबत्ती उत्पादक आहेत जे सुगंध न घालता अगरबत्ती विकतात. किंवा ग्राहकांच्या आवडीनुसार सुगंध जोडला जाऊ शकतो, कोणत्या सुगंधाला प्राधान्य दिले जावे हे जाणून घेण्यासाठी बाजार सर्वेक्षण करावे.
4)अगरबत्ती बनवण्याची यंत्रे– (Agarbatti Business)
अगरबत्ती बनवण्याच्या व्यवसायात यंत्रांना खूप महत्त्व आहे. बाजारात विविध प्रकारची मशिन्स उपलब्ध आहेत, परंतु बजेटनुसार ती निवडणे आवश्यक आहे.
१)मॅन्युअली चालवल्या जाणार्या मशीन्स सिंगल पेडल किंवा डबल पेडल प्रकारात खरेदी केल्या जाऊ शकतात. जे ऑपरेट करण्यास सोयीस्कर असतं जेणेकरुन कमी खर्चात जास्त उत्पादन मिळू शकतं. पेडल मेकॅनिझममुळे हे यंत्र मॅन्युअली चालवता येते आणि त्यामुळे विजेचा वापर होत नाही. ही मॅन्युअल अगरबत्ती बनवणारी मशीन ऑटोमॅटिकच्या तुलनेत खूपच परवडणारी आहेत.
२) समजा एखाद्याला जास्ती प्रमाणात उत्पादन करायचे आहे. अशावेळी, या ऑटोमेटीक अगरबत्ती बनवणाऱ्या मशीन्सचा पर्याय निवडला पाहिजे कारण अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ही ऑटोमेटीक मशीन प्रति मिनिट अंदाजे १६० ते २०० काठ्या तयार करतात. अगरबत्ती बनवणारी यंत्रे ग्राहकाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या आकर्षक डिझाईन्स, नमुने, आकार बनवू शकतात.
३)हायस्पीड ऑटोमॅटिक अगरबत्ती बनवणाऱ्या मशीनला कमी मनुष्यबळ पुरेसं ठरतं कारण ती पूर्णपणे स्वयंचलित असते. अशा मशीन्स प्रति मिनिट ३०० ते ४५० काड्या तयार करू शकतात. या मशीन्समध्ये अगरबत्तीच्या लांबीचे उत्पादन समायोजित करण्याचे वैशिष्ट्य आहे.
४) ड्रायर मशीन: ज्या ठिकाणी अगरबत्ती तयार केली जाते ती जागा दमट हवामानाची असल्यास कच्ची अगरबत्ती सुकविण्यासाठी ड्रायर मशीन खरेदी करणे आवश्यक आहे. हे ड्रायर मशीन पावसाळ्यातही कामी येतं.
५)पावडर मिक्सर मशीन: अगरबत्ती बनवण्यासाठी कच्च्या पदार्थांचे एकसमान मिश्रण बनवण्याच्या उद्देशाने, पावडर मिक्सर मशीन खूप उपयुक्त आहे कारण ते ओलं किंवा कोरडं पावडर मिश्रण अचूक प्रमाणात मिसळू शकतं. पावडर मिक्सर मशीन १० ते २० किलो मिश्रण प्रति मिनिट मिक्स करू शकतं.
5) किती फायदा होऊ शकतो?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि इतकं सगळं केल्यानंतर अगरबत्ती व्यवसायात तुम्हाला नेमका किती फायदा होईल. तर हे सर्व तुम्ही किती अगरबत्तीची विक्री करता यावर अवलंबून असत. तरीही अंदाजे तुम्ही दर महिन्याला २ लाख रुपयांची उलाढाल करू शकता आणि त्यातून तुम्हाला ७० ते ८० हजार रुपये फ़ांद्या सहज होऊ शकतो.