Agriculture Success Story : या बदलत्या काळात जर का आपण परंपरेने चालत आलेल्या पिकांना तंत्रज्ञानाची जोड दिली तर त्यातून भरपूर उत्पन्न मिळवणे शक्य आहे. आजच्या तरुण पिढीला शेती म्हणजे कमकुवत व्यवसाय वाटतो, देशातील तरुण शेत जमीन सोडून शहराकडे वळताना दिसतात. मात्र या सर्व सगळ्यात काही शेतकरी असेही आहेत जे शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन एक वेगळंच उदाहरण जगासमोर मांडत आहेत. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील, गंगापूर तालुक्यातील चिंचखोड या गावचे शेतकरी राहुल डुबे हे देखील यातीलच एक उदाहरण आहेत. त्यांनी परंपरागत पिकांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत अधिकाधिक उत्पन्न मिळवून दाखवले आहे. एक एकर आल्याच्या लागवडीतून दहा लाखांचे उत्पन्न उभे करणाऱ्या या शेतकऱ्याचा नेमका फॉर्मुला काय हे पाहुयात.
आल्याच्या शेतीतून कशी केली भरघोस कमाई? (Agriculture Success Story)
राहुल डुबे यांच्या घराची दहा एकर जिरायती शेती असून त्यातील एक एकर भागात ते दरवर्षी आल्याचे उत्पादन करतात. राहिलेल्या भागात तूर, मका, गहू यांसारख्या पिकांचे उत्पन्न केले जाते. राहुल हे आल्याची शेती करताना एकरी तीन ते चार ट्रॉली शेणखत टाकून शेतीची मशागत करतात, आणि त्यानंतर त्यावर आल्याची लागवड केली जाते. पिकाला पाण्याचा पुरवठा होण्यासाठी ते ठिबक सिंचनचा वापर करतात. ठिबक सिंचन मध्ये थेंब थेंब पाणी हे पिकाच्या मुळावर जात असल्याने पाण्याचा अपव्यय टाळला जातो तसेच केवळ पिकाला पाण्याचा पुरवठा होऊन इतरत्र नको असलेली झाडं तयार होत नाहीत.
या पिकासाठी खत तयार करताना सुद्धा ते एका वेगळ्याच व्यवस्थापनाचा वापर करतात. निंबोळी पेंड, DAP आणि सुपर फॉस्फेट यांच्यासोबत इतर काही सूक्ष्म अन्नद्रव्य एकत्र करून राहुल खत बनवतात. आणि किड्या कीटकांपासून पिकाचे रक्षण होण्यासाठी आवश्यक ती फवारणी करतात. त्यांचा याच व्यवस्थापनाच्या आधारे गेल्यावर्षी त्यांनी 140 क्विंटल आल्याचे उत्पन्न तयार केले होते.
राहुल म्हणतात की सुरुवातीला बाजारी भाव हा तसा कमीच होता. केवळ 3600 प्रति क्विंटल दराने त्यांना 3 ते 4 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. हंगामाच्या शेवटी आल्याचे बाजारी भाव 10000 प्रती क्विंटल पेक्षाही पुढे गेले. ही जुनी बाजारी परिस्थिती पाहता यावेळी त्यांना एकरी 150 क्विंटल आल्याचे उत्पादन तयार करायचे असून यामधून नऊ ते दहा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न तयार करण्याची त्यांना अशा आहे (Agriculture Success Story). सध्या राहुल यांचा व्यवसाय पाहता पारंपारिक पिकांना तंत्रज्ञानाची जोड दिल्यास त्यातून भरघोस कमाई केली जाऊ शकते याचे ते सर्वात उत्तम उदाहरण आहेत.