Amazon Layoffs : मागच्या वर्षभरात अनेक कंपन्यांनी मोठया प्रमाणात कर्मचारी वर्गाला नारळ देऊन घरी बसवलं होतं. यात Microsoft, Amazon, Spotify यांसारख्या मोठमोठाल्या कंपन्यांनी अनेक कर्मचाऱ्यांच्या अंकात कपात केली होती. वर्ष उलटलं असलं तरीही नोकरीवरून काढून टाकण्याचं संकट काही कर्मचाऱ्यांच्या डोक्यावरून टाळलेलं नाही. आज समोर आलेली बातमी हेच सांगते की ऑनलाईन शॉपिंगचा परिचित प्लॅटफॉर्म म्हणजेच Amazon पुन्हा एकदा कर्मचारी कमी करण्याच्या तयारीत आहे. सध्या Amazon Buy with Prime यूनिटमधल्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रास्ता दाखवण्याच्या विचारात आहे.
Amazon पुन्हा का करतोय कर्मचाऱ्यांची कपात? (Amazon Layoffs)
Amazon कंपनीने वर्ष 2021 मध्ये Buy with Prime यूनिटची सुरुवात केली होती आणि कंपनीचे हे युनिट लॉजिस्टिकस नेटवर्क सुधारण्यात आणि व्यापाऱ्यांची मदत करण्याचं काम बघत असे. आता मात्र कंपनीला या युनिटमधल्या 5 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करायची आहे. अद्याप कंपनीने कपातीचा अमुक एक आकडा जाहीर केलेला नसला, तरीही माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार Amazon च्या या एका निर्णयाचा परिणाम किमान 30 पेक्षाही अधिक कर्मचाऱ्यांवर होण्याची शक्यता आहे. एका मागून एक विभागातून कर्मचारी कमी करत असलेला Amazon मात्र याबाबत आपली बाजू सांभाळून आहे, कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनी दुसऱ्या युनिटमध्ये किंवा वेगळ्याच कंपनीमध्ये नोकरी मिळवून देण्यात नक्कीच प्रयत्न करेल.
गेल्या दोन वर्षांपासून जगभरातील विविध कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात करायला सुरुवात केली आहे, आणि यामागे प्रत्येक कंपनी स्वतःचं असं वेगळंच कारण देऊन वेळ मारून नेण्याचं काम करते. कदाचित तुम्हाला माहिती असेल कि या अगोदर काही दिवसांपूर्वी Amazon ने त्याच्या अंतर्गत येणाऱ्या ट्विच या कंपनीमधून मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना बाहेरचा रास्ता दाखवला होता(Amazon Layoffs). ब्लूमबर्गने सादर केलेल्या अहवालानुसार कंपनीने ट्विचमधून जवळपास 35 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं होतं. गेल्यावर्षी केवळ Amazon च नाही तर Google सारख्या दिग्गज कंपनीने देखील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गाची हकलपट्टी केली होती.