Ambani And Tata Deal: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि देशातील सर्वात जुने व्यापारी घराणे टाटा समूह हे सध्या एका संयुक्त करार करण्याचा विचार करत आहेत. एका वृत्तानुसार अंबानींची रिलायन्स कंपनी टाटा प्लेमध्ये हिस्सा घेण्यासाठी Walt Disney शी चर्चा करत आहे. जर या चर्चा यशस्वी झाल्या तर, ही पहिलीच वेळ असेल जेव्हा टाटा आणि अंबानी एका संयुक्त उपक्रमात सहभागी होतील. थोडक्यात सांगायचं तर भारतातील सर्वात मोठ्या कंपन्या एकत्र येऊन नवीन बिझनेस सुरू करण्याचा विचार करत आहेत.आत्तापर्यंत या दोन कंपन्या एकमेकांच्या स्पर्धक म्हणून वावरत होत्या, पण व्यवसाय वाढवण्यासाठी आता त्या एकत्र येऊ शकतात.
अंबानी आणि टाटा एकत्र येणार का? (Ambani And Tata Deal)
भारतातील टेलिव्हिजन क्षेत्रात आपले वर्चस्व वाढवण्यासाठी उद्योगपती मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून, रिलायन्स आणि Walt Disney या दोन दिग्गज कंपन्यांमध्ये करार होण्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगली आहे. या करारानुसार, रिलायन्स कंपनी Tata Play या दूरदर्शन सेवांमध्ये 29.8 टक्के हिस्सा विकत घेण्याची शक्यता आहे, यामुळे भारतातील दूरदर्शन क्षेत्रात रिलायन्सचे स्थान आणखी मजबूत होईल आणि Jio Cinema या त्यांच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मची देखील व्याप्ती वाढेल.
एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, रिलायन्स कंपनी सिंगापूरमधील Temasek कंपनीमधील आपली 20 टक्के हिस्सेदारी विकण्याचा विचार करत आहे. या हिस्सेदारीची एकूण किंमत 1 अब्ज डॉलर्स इतकी आहे. यासाठी रिलायन्स टाटा ग्रुपसोबत चर्चा करत आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणताही करार झालेला नाही. रिलायन्स, Disney आणि टाटा सन्स या कंपन्यांच्या प्रवक्त्यांनी याबाबत कोणतीही टिप्पणी करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. टाटा ग्रुपची प्रमुख कंपनी असलेल्या टाटा सन्सकडे सध्या एका टीव्ही कंपनीमध्ये 50.2 टक्के हिस्सा आहे आणि उर्वरित हिस्सा सिंगापूरच्या Temasek या गुंतवणूक कंपनीकडे आहे. अद्याप या चर्चा पक्क्या झाल्या नाहीत, पण जर असं झालं तर टाटा आणि रिलायन्स यांचा हा पहिला संयुक्त उपक्रम(Ambani And Tata Deal) असेल.