Ambuja Cement : गौतम अदानी यांचा बाजारात धमाका; कोट्यवधी रुपयांची कंपनी घेतली विकत

Ambuja Cement : अमरिकेतील हिंडेनबर्ग कंपनीने हेराफेरीचे आरोप लावल्यानंतर गौतम अदानी यांची कंपनी संकटांच्या भोवऱ्यात सापडली होती. कंपनीचे शेअर्स तर उतरलेच पण यासोबतच मार्केट कॅपमध्ये देखील 100 कोटी रुपयांची घसरण झाली होती. अदानी समूहाने गेल्या सहा महिन्यांत अनेक चढ-उतारांचा सामना केला आहे. परंतु “प्रयत्नांती परमेश्वर” म्हणतात त्याप्रमाणे आता शेवटी समूहाच्या प्रयत्नांना यश मिळताना दिसतंय. कालच अमेरिका सरकारने अदानी सदर प्रकरणात निर्दोष असल्याचा दावा केला आहे, तसेच यामुळे शंकेच्या नजरा आता हिंडेनबर्गवर रोखल्या जात आहेत. अदानी समूहाला हा मोठा दिलासा मिळाल्यानंतर त्यांनी बाजारात धमाकेदार एन्ट्री केली, अदानी समूहाने नेमकं कोणतं यश संपादन केलंय जाणून घेऊया…

अदानी समूहाची धमाकेदार एन्ट्री: (Ambuja Cement)

अमेरिका सरकार कडून मिळालेला दिलासा हा समूहासाठी अत्यंत महत्वाचा ठरला आहे, कारण यानंतर अदानी समूहाचे केवळ शेअर्सच वाढले नाहीत तर त्यांनी अख्याच्या-अखी एक कंपनीच विकत घेतली आहे. गौतम अदानी हे देशातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून ओळखले जातात, आणि कालच त्याच्या नेतृत्वाखाली अंबुजा सिमेंट(Ambuja Cement) या प्रसिद्ध कंपनीने सांघी इंडस्ट्रीज लिमिटेड यांचे अधिग्रहण केले आहे. हा ताबा मिळवण्यासाठी 121.90 प्रती शेअर अशी किंमत मोजली गेली आहे. अगोदर ऑगस्ट महिन्यामध्ये अंबुजा सिमेंट कंपनीने सांघी कंपनीला 10 रुपयांच्या दर्शनी मुल्ल्यांच्या आधारे 26 टक्के भांडवल विकत घेण्यासाठी 114.22 प्रती शेअर अशी किंमत देऊ केली होती.

आपल्या देशात अल्ट्राटेक हि सिमेंटची सर्वात मोठी कंपनी समजली जाते, आणि त्यांच्या पाठोपाठ अंबुजा सिमेंटचा नंबर लागतो. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात अदानी समूहाने अंबुजा सिमेंटचा (Ambuja Cement) मोठा हिस्सा विकत घेऊन सिमेंटच्या बाजारात प्रवेश केला होता. सध्या अदानी समूहाची अंबुजा सिमेंटमध्ये 54.51 टक्क्यांची भागेदारी आहे. आणि सांघी इंडस्ट्रीज पश्चिम भारतातील एक मोठी सिमेंट कंपनी असल्याने या अधिग्रहणाचा फायदा आता अदानी समूहाला मोठ्या प्रमाणात होणार आहे. हिंडेनबर्गने लावलेल्या आरोपांमधून अदानी समूहाची हळूहळू सुटका होत असताना कंपनीने उचलेले हे सर्वात मोठे पाऊल आहे.