AMG Media Networks : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती म्हणजेच गौतम अदानी नेहमीच त्यांच्या अनोख्या व्यावहारिक चालींसाठी ओळखले जातात. अमेरिकेतील हिंडेनबर्गच्या अहवालामुळे नुकसान सोसलेला अदानी समूह आता पुन्हा एकदा आपली जुनी ओळख मिळवण्याच्या तयारीत आहे. बाजारातील मोठमोठाले करार स्वतःसाठी फायदेशीर ठरतील याच तयारीत समूह सर्वत्र बाजी मारत आहे. आज देखील गौतम अदानी यांनी अश्याच एका करारावर स्वाक्षरी केली. हा संपूर्ण करार पूर्ण झाल्यानंतर गौतम अदानी यांना न्यूज एजन्सी (News Agency) IANS म्हणजेच Indo-Asian News Service मधली हिस्सेदारी वाढून 76 टक्के झाली आहे. समूहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स या उपकंपनीने IANS न्यूजमध्ये 5 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केल्यामुळे समूहाची IANS या मीडिया कंपनीमधली जुनी 50.5 टक्क्यांची हिस्सेदारी वाढली आहे.
अदानींची मीडिया क्षेत्रात वाटचाल : (AMG Media Networks)
अदानी समूहाच्या उपकंपनीने Indo-Asian News Service मधले शेअर्स खरेदी केले असल्यामुळे त्यांची एकूण हिस्सेदारी 76 टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे. अदानी समूहाचे हे काही मीडियाच्या क्षेत्रात पदार्पण नाही कारण, याआधी देखील त्यांनी NDTV या प्रसिद्ध टीव्ही न्युज चॅनलमध्ये आपले नाव लिहिले होते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 16 जानेवारी 2024 रोजी Indo-Asian News Service च्या बोर्डची बैठक झाली असून त्याच दरम्यान समूहाला कंपनीच्या शेअर्सची खरेदी करण्याला मान्यता देण्यात आली होती. पुढे अदानींची उपकंपनी असेही सांगते की आता त्यांना IANS च्या मतदान अधिकार श्रेणीमध्ये 76 टक्क्यांची तर गैर मतदान अधिकार श्रेणीमध्ये 99.26 टक्क्यांची हिस्सेदारी मिळाली आहे.
कोणताही व्यवसाय वृद्धिंगत करायचा असेल तर मीडियाशिवाय चांगला पर्याय नाही, मात्र जाणून घ्या की मीडिया क्षेत्रात पदार्पण करण्याची गौतम अदानींची हि पहिलीच खेप नाही. यापूर्वी देखील त्यांनी NDTV मध्ये 65 टक्क्यांची हिस्सेदारी खरेदी केली होती, तसेच Quintillion Business Media वर देखील वर्ष 2022 मध्ये आपले नाव कोरले होते.
याआधी खरेदी केला होता कंपनीचा अर्धा हिस्सा :
यापूर्वी डिसेंबर 2023 मध्ये पहिल्यांदाच अदानी समूहाच्या AMG Media Networks Limited ने IANS मीडिया कंपनीमधला 50.50 टक्के भांडवल विकत घेतल्याची माहिती समोर आली होती. कंपनीने नियामक फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार IANS चे संचालन आणि व्यवस्थापन AMG मीडियाने पूर्ण केले होते, त्यानंतर समूहाच्या उपकंपनीला IANS च्या सर्व संचालकांची नियुक्ती करण्याचा अधिकार देखील मिळाला मात्र अदानी एंटरप्रायझेसने या कराराची रक्कम उघड केली नाही(AMG Media Networks).
गौतम अदानी यांनी पुन्हा एकदा मीडिया क्षेत्रात बाजी मारली असल्यामुळे अदानी आणि अंबानी या दोन्ही दिग्गज उद्योजकांचे द्वंद्व आता मीडिया क्षेत्रात देखील पाहायला मिळणार आहे. अदानी समूहाच्या प्रसिद्ध मीडिया कंपन्या NDTV आणि NDTV Profit यांची मुकेश अंबानी यांच्या News18 आणि Money control यांच्याशी स्पर्धा पाहायला मिळेल.