बिझनेसनामा ऑनलाईन । अविनाश भोसले (Avinash Bhosale) हे नाव पुण्यात आलेल्या प्रत्येकाला पहिल्या महिन्यातच माहित होत. गणेशखिंड रोडला ABIL House नावाची इमारत आणि कोरेगाव पार्क मधील Westin नावाचे Hotel याच व्यक्तीचे आहे, हे कोणीही डोळे झाकून सांगत. एक साधा रिक्षाचालक ते हेलिकॅप्टर भाड्याने देणारा उद्योगपती म्हणून त्यांची ओळख तयार झाली. राजकारण्यांशी संबंध तयार करून जलसंपदा विभागातील कामांचे कंत्राटदार मिळवून.उद्योग क्षेत्रात अविनाश भोसले यांनी जम बसवला. त्यांचाच जीवनप्रवास आपण समजून घेणार आहोत.
रिक्षाचालकापासून केली करिअरला सुरुवात – Avinash Bhosale
अविनाश भोसले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील तांबवे आहे. त्यांचे वडील जलसंपदा विभागात अभियंता असल्यामुळे बदलीनिमित्त संगमनेर येथे कुटुंबाला स्थलांतर करावे लागले. ग्रामीण भागातून शहरात रोजगाराच्या शोधात तरुण लोक येतात, तसेच अविनाश भोसलेही संगमनेर येथून पुण्याला आले. पुण्यात आल्यानंतर रिक्षा चालवायला सुरुवात केली. रिक्षा चालवून मिळालेल्या पैशात रास्ता पेठ भागात त्यांनी भाड्याने राहायला खोली घेतली. रिक्षाच्या धंद्यात चांगला जम बसल्यानंतर त्यांनी रिक्षा भाड्याने द्यायलाही सुरुवात केली. त्यानंतर बांधकाम क्षेत्रातील लोकांशी हळूहळू ओळख वाढत गेली. त्यानंतर बांधकाम क्षेत्रातील काम घ्यायला सुरुवात केली. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारीच्या माध्यमातून ओळखी वाढत गेल्या आणि त्यांनी बांधकाम व्यवसायात पडण्याचा निर्णय घेतला.
स्वतःची बांधकाम कंपनी केली चालू –
अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना स्वतःची बांधकाम व्यवसाय कंपनी असावी अशी गरज निर्माण झाली. त्यांनी १९७९ मध्ये ABIL ग्रुपची म्हणजेच (अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड) कंपनीची स्थापना केली. पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर या ऑफिसची इमारत दिमाखात उभी आहे. ABIL ग्रुपच्या वेबसाईटवर कंपनीने केलेल्या कामांबद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
जलसंपदा विभागातील कामांमुळे अविनाश भोसले यांचा बांधकाम क्षेत्रात खऱ्या अर्थाने श्री गणेशा झाला. कारण याआधी ते फक्त पुणे महानगरपालिकेची काँट्रॅक्ट्स घेत असत. १९९५ साली शिवसेना – भाजप सरकारचे युती सरकार होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात पाण्यासाठी सरकारच्या वतीने प्रयत्न सुरु करण्यात आले. त्यासाठी युती सरकारने कृष्णा खोरे विकास मंडळाची स्थापना केली होती.
जलसंपदा विभागातील कामांना केली सुरुवात –
कृष्णा खोरे विकास मंडळाच्या माध्यमातून कालवे, धरणे आणि पाटबंधारे विभागाचे विविध कामांची सुरुवात अविनाश भोसले यांनी केली. याआधी जलसंपदा विभागातील कामे खासकरून आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडू या राज्यांमधील कंत्राटदारांना दिली जात. आपणही अनेक वेळा धरणांची कामे पाहायला गेल्यावर रेड्डी किंवा दक्षिण भारतातील आडनावाच्या लोकांची नावे दिसली असतील. पण राजकारणात ‘खास’ संबंध असणाऱ्या अविनाश भोसले यांना युती सरकारने या कामांची काँट्रॅक्ट्स दिली आणि एका अर्थाने त्यांच्या बांधकाम व्यवसायाला आर्थिक हातभारच लावला.
हळूहळू अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना मोठी कामे मिळायला लागली. राजकारण्यांच्या जीवनाचा अविनाश भोसले हे आता महत्वाचा भाग बनले होते. १९९५ ते १९९९ या काळात त्यांनी स्वतःच्या व्यवसायाची घडी बसवली. १९९९ ला युती सरकार जाऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार आलं. सुरुवातीला युती सरकार बरोबर जुळवून घेणारे अविनाश भोसले आता आघाडी सरकारशी जमवून घ्यायला लागले होते. या सरकारच्या काळात पुण्यात मध्यवर्ती ठिकाण म्हणून पाय रोवायला अविनाश भोसले यांनी सुरुवात केली. येथे फाईव्ह स्टार हॉटेल्स, बांधकाम काँट्रॅक्ट्स यांच्या कामाला सुरुवात केली.
राजकारण्यांशी होते चांगले संबंध –
२०१३ मध्ये शरद पवार यांची सांगली दौऱ्यावर असताना अचानक तब्येत बिघडली होती. यावेळी सांगलीवरून पुण्याला आणणारे हेलिकॅप्टर अविनाश भोसले यांचे होते. ते विमान बाणेर येथील ‘व्हाईट हाऊस’ या भोसले यांच्याच बंगल्यावर उतरवण्यात आले होते. पुण्यातील कोरेगाव पार्क येथे जहाजाच्या आकाराचे वेस्टीन नावाचे हॉटेल आहे. ते अविनाश भोसले यांच्या मालकीचे आहे. वेस्टीन या हॉटेलच्या उदघाटनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख. शरद पवार, गोपीनाथ मुंडे, पतंगराव कदम आणि त्यावेळेस देशाचे गृहमंत्री असलेले सुशीलकुमार शिंदे हे उपस्थित होते
एकेकाळी हेलिकॅप्टर मधून फिरून ‘पाहावा विठ्ठल’ या पुस्तकासाठी फोटो काढणारे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अविनाश भोसलेंची मदत घेतली होती कारण त्यांनी वापरलेले हेलिकॅप्टर भोसलेंचे होते. या काळात अविनाश भोसले यांच्या हेलिकॅप्टर डिप्लोमसीची चर्चा झाली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अविनाश भोसले यांच्या महाबळेश्वर येथील बंगल्यावरच मुक्काम करत. पुण्याच्या दौऱ्यावर बाळासाहेब ठाकरे आले की त्यांच्या गाडीचे स्टेरिंग अविनाश भोसलेंच्या हातात असायचे. पतंगराव कदम यांचे चिरंजीव आणि राज्याचे माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे अविनाश भोसले आहेत.
अविनाश भोसलेंच्या अडचणींत वाढ –
फार कमी काळात अविनाश भोसले यांचा श्रीमंतीकडचा प्रवास वेगाने झाला. सिंचन घोटाळ्यात घोटाळा झाल्यामुळे अविनाश भोसले यांनी अंग काढून घेतले. २००७ मध्ये पहिल्यांदा त्यांच्यावर पेमा कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली. परदेशातून भारतामध्ये येताना त्यांनी मोठ्या प्रमाणावर सोने आणि रोख रक्कम स्वतःबरोबर आणली होती. यावेळी त्यांना विमानतळावरही अडवण्यात आले होते. पण अविनाश भोसले यांच्या राजकीय संबंधांमुळे याची पुढे चौकशी झाली नाही.
DHFL आणि YES BANK या बँकांमधील घोटाळ्याच्या संदर्भात अविनाश भोसले यांना ईडीने अटक केली होती. त्यांनी एप्रिल २०१८ ते जून २०१८ मध्ये हजारो कोटी रुपये एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वळवण्यात आले होते. मे २०२३ मध्येही सीबीआयने अविनाश भोसलेंना अटक केली होती.