Bank Holidays In December : डिसेंबर महिन्यात 18 दिवस बँका बंद; पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bank Holidays In December । गेले दोन महिने म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे काही ना काही सणांमुळे पूर्णपणे व्यस्तच राहिले. दिवाळी आणि दसरा यांसारख्या महत्त्वाच्या सणांमुळे देशातील बँकांना देखील मोठी सुट्टी देण्यात आली होती. मात्र आता डिसेंबर महिन्यात पुन्हा एकदा काही दिवसांसाठी विविध राज्यातील बँका बंद असणार आहेत. आता आपण बऱ्यापैकी नेट बँकिंगचा वापर करत असलो तरीही काही कामं अशी असतात जिथे बँकेत गेल्याशिवाय पर्यायच उपलब्ध असत नाही. त्यामुळे तुमची जर का अशी काही महत्वाची कामं मागच्या सणासुदीमुळे अडकून राहिलेली असतील तर ती जास्ती काळासाठी थोपवून ठेवू नका कारण पुन्हा एकदा डिसेंबर महिन्यात बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज घेऊया देशातील बँका ह्या नेमक्या किती दिवसांसाठी सुट्टीवर जाणार आहेत…

डिसेंबर महिन्यात एवढे दिवस बँका बंद असतील: (Bank Holidays In December)

तर डिसेंबरच्या महिन्यात एकूण 18 दिवसांसाठी देशातील काही बँका बंद राहणार आहेत. मागचे दोन महिने हे सणांचे असल्यामुळे अनेक आर्थिक काम आपण पुढे ढकलली असण्याची शक्यता आहे, त्यामुळे या सुट्ट्यांची यादी आज नीट तपासून घ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या कामांची लवकरात लवकर दखल घेऊन ती पूर्ण करून टाका. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या बातमीनुसार बँक संघटना डिसेंबर महिन्यामध्ये सहा दिवसांच्या संपावर जाणार आहेत, त्यामुळे शनिवार आणि रविवार धरून देशातील बँका एकूण 18 दिवसांसाठी बंद राहतील(Bank Holidays In December).

मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की बँकांच्या या सुट्ट्या सरसकट सर्व बँकांना एकाच दिवशी लागू होत नसतात. प्रत्येक राज्यानुसार आणि त्या प्रदेशाची गरज आणि सोयीनुसार या सुट्ट्या बदलत असतात, त्यामुळे तुमच्या भागात असणाऱ्या बँकेला कधी सुट्टी आहे आणून घेऊन नियोजन करता आलं पाहिजे. मात्र बँका जरी बंद असल्या तरीसुद्धा ATM चा वापर हा 24 तास करता येतो तसेच नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा UPIद्वारे पैशांची उलाढाल करता येते.

दरवेळी प्रमाणेच देशातील सर्वोच्च बँक म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडियाने बँकांच्या नावे डिसेंबर महिन्यातल्या सुट्टीची यादी (Bank Holidays In December) जारी केली आहे, जी खालील प्रमाणे आहे:

1 डिसेंबर 2023: राज्य उद्घाटन दिनामुळे अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये बँका बंद असतील.

4 डिसेंबर 2023: सेंट फ्रान्सिस झेवियर सणानिमित्त गोव्यातील बँका बंद असतील.

9 डिसेंबर 2023: दुसरा शनिवार.

10 डिसेंबर 2023: रविवार.

12 डिसेंबर 2023: मेघालयमध्ये पा-टोगन नेंगमिंजा संगमामुळे बँका बंद असतील.

13 आणि 14 डिसेंबर 2023: सिक्कीममध्ये लोसुंग आणि नामसुंगमुळे बँका बंद असतील.

17 डिसेंबर 2023: रविवार .

18 डिसेंबर 2023: यू सोसो थामच्या पुण्यतिथीनिमित्त मेघालयातील बँका बंद असतील.

19 डिसेंबर 2023: गोवा मुक्ती दिनानिमित्त गोव्यातील बँका बंद असतील.

23 डिसेंबर 2023: चौथा शनिवार.

24 डिसेंबर 2023: रविवार.

25 डिसेंबर 2023: ख्रिसमसनिमित्त देशभरात बँका बंद असतील.

26 डिसेंबर 2023: मिझोरम, नागालँड आणि मेघालयमध्ये ख्रिसमसमुळे बँका बंद असतील.

27 डिसेंबर 2023: नागालँडमध्ये ख्रिसमसमुळे बँका बंद असतील.

30 डिसेंबर 2023: यू कि आंग नांगबाहमुळे नागालँडमध्ये बँका बंद असतील.

31 डिसेंबर 2023: रविवार.