Boycott Maldives : भारताच्या पंतप्रधानांनी लक्षद्वीपवरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर मालदीव मधल्या काही मंत्र्यांनी त्याविरुद्ध टीकास्त्र सोडले. मात्र हे टीकास्त्र त्यांच्याच अंगाशी आलेले असून भारतात सोशल मीडियावर सर्वत्र Boycott Maldives हा ट्रेंड सुरू झाला आहे. या बहिष्कारामुळेच आपल्या देशातील कित्येक पर्यटक मालदीवला जाण्याचे तिकीट रद्द करीत आहेत. मालदीव हा प्रदेश खास करून पर्यटनासाठी ओळखला जातो व त्यांची अधिकाधिक मिळकती देखील पर्यटन क्षेत्रातून होत असते. परंतु Boycott Maldives हा ट्रेंड जर का अशाप्रकारे सुरू राहिला तर येणाऱ्या काळात त्यांच्या अर्थव्यवस्थेला भल्या मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. टिप्पणी केलेल्या तीन मंत्र्यांना मालदीव सरकारने त्वरित निष्कासित केलेले असूनही अद्याप भारतातील परिस्थिती पूर्ववत झालेली नाही. आता भारतातून मालदीवर घालण्यात आलेला बहिष्कार हा सोशल मीडिया पुरता मर्यादित राहिलेला नसून आपल्या देशातील अनेक व्यापारी संघटना आणि कंपन्या मालदीवच्याविरुद्ध जबाब सादर करीत आहेत.
‘या इन्शुरन्स’ कंपनीने मालदीवला दिले थेट उत्तर: (Boycott Maldives)
सोमवारी सकाळी EaseMy Trip या कंपनीने मालदीवला जाणारी सर्व बुकिंग रद्द केले होते. तसेच देशाच्या प्रधानमंत्र्यांविरुद्ध अपमानास्पद शब्द वापरले गेले असल्याने ही कंपनी मालदीवला पर्यटक घेऊन जाणार नाही अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली होती. EaseMy Trip नंतर आता भारतातील अजून एक ट्रॅव्हल टेक स्टार्टअप इन्शुरन्स कंपनी म्हणजेच Insurance Dekho यांनी देखील मालदीवच्या विरुद्ध शस्त्र उगारले आहे. या कंपनीने मालदीवला जाणाऱ्या लोकांचे ट्रॅव्हल इन्शुरन्स सस्पेंड करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कंपनीचे संस्थापक आणि CEO ईश बब्बर यांनी लिंक्डइन सदर निर्णयाची घोषणा केली होती. सध्या देशातील केवळ या दोन कंपन्याच नाही तर यापूर्वी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सने टुरिझम अँड ट्रेड असोसिएशनला त्वरित मालदीवच्या पर्यटनावर रोख लावण्याचा आदेश दिला होता (Boycott Maldives). मालदीवला जाणाऱ्या सर्व प्रकारच्या विमानसेवा त्वरित रद्द करण्यात येऊन त्यांनी लक्षद्वीपकडे उड्डाण घ्यावं असा आदेश देण्यात आला होता.
देशातील विविध उद्योजक काय म्हणतात?
EaseMy Tripचे मालक निशांत पट्टी यांनी X वर सदर प्रकरणाची माहिती देताना म्हटलं, की “EaseMy Trip ही भारतीय कंपनी आहे आणि देशाच्या पंतप्रधानांचा अपमान करणाऱ्या प्रदेशासोबत ती व्यवहार करणार नाही. आपण सर्वजण एकत्र आहोत”. शिवाय एडलवाईस म्युच्युअल फंडच्या मालकीण राधिका गुप्ता या देखील म्हणाल्या होत्या की आपल्याजवळ अंदमान आणि लक्षद्वीप असताना मालदीवला जाण्याची काहीही गरज नाही, अधिकाधिक खर्च करून परदेशात न जाता हा पैसा भारताचा खर्च करावा. सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ पुनावाला यांनी देखील आपल्या देशात अकल्पनीय आणि उत्कृष्ट पर्यटन स्थळे असताना बाहेर जाण्याची गरज नाही असे मत व्यक्त केले होते. भारतात केवळ सोशल मीडियाचे वापरकर्तेच नाही तर मोठमोठाले उद्योजक देखील संतापले असून मालदीवला याचा वाईट परिणाम भोगावा लागेल अशी शक्यता आहे.