बिझनेसनामा ऑनलाईन । मंदीच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवत आहेत. यापूर्वीच अनेक आयटी आणि टेक कंपन्यानि आपल्या कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याचे आपण ऐकले किंवा वाचले असेल परंतु आता टेलिकॉम क्षेत्रातही मंदीचे सावट दिसत आहे. हाच धोका पाहून युनायटेड किंगडम येथील दूरसंचार कंपनी बीटी ग्रुपने आपल्या तब्बल ५५ हजार कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीची पुनर्रचना आणि खर्चात झालेली कपात लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम टप्प्याटप्प्याने 2030 पर्यंत पूर्ण केले जाईल. सध्या बीटी ग्रुप कंपनीत एकूण 1,30,000 कर्मचारी आहेत, यामध्ये कर्मचारी ते कंत्राटदार समावेश आहे. मात्र 2030 पर्यंत कंपनी अनेकजणांना नारळ देत आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या 75,000 ते 90,000 ठेवेल.
बीटी ग्रुपचे म्हणणे आहे की त्यांच्या फायबर-ऑप्टिक ब्रॉडबँड आणि 5जी सेवेच्या पूर्ण रोलआउटनंतर, त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात कामगारांची गरज लागणार नाही. कंपनीचे बॉस फिलिप जॅनसेन यांनी सांगितले की, फायबर रोल-आउट पूर्ण केल्यानंतर, कंपनी काम करण्याच्या पद्धतीचे डिजिटायझेशन आणि स्ट्रक्चर सोप्प करण्यासाठी काम करत आहे.
व्होडाफोन 11,000 कर्मचार्यांना नारळ देणार-
दरम्यान, यापूर्वी ब्रिटीश स्थित दूरसंचार कंपनी व्होडाफोनने देखील आपल्या कर्मचार्यांमध्ये मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. व्होडाफोन तब्बल 11,000 कर्मचार्यांना नारळ देणार असून असून येत्या तीन वर्षांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. ऐकून सर्व घडामोडी पाहता जग पुन्हा एकदा आर्थिक मंदीच्या संकटात तर येणार नाही ना ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.