Budget 2024: बजेटच्या घोषणेने केली शेतकऱ्यांची निराशा; “नाव मोठं, लक्षण खोटं” ठरल्याने अपेक्षाभंग

Budget 2024: काल नवीन संसद भवनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला, केवळ तीन महिन्यांसाठी वैध असणारा हा अर्थसंकल्प काही जणांच्या पसंतीत उतरला तर काहींना हा “नाव मोठं लक्षण खोटं” या म्हणीची प्रतिकृती वाटला. सर्वात महत्वाचं म्हणजे कालच्या अर्थसंकल्पामधून देशातील शेतकरी बांधवाना मदत मिळण्याची अपेक्षा केली जात होती. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात अर्थमंत्री काही ना काही विशेष घोषणा नक्कीच करतील अशी अशा होती मात्र सरकारकडून यावर पूर्णपणे पाणी फिरवण्यात आलं आहे.

सरकारचं बजेट शेतकऱ्यांना रुचलं नाही: (Budget 2024)

काल सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पामधून सरकार देशातील शेतकऱ्यांना नक्कीच आनंदाची बातमी देईल अशी अपेक्षा केली जायची, मात्र याबद्दल सरकारकडून कुठलीही घोषणा न केली गेल्याने अनेकांचा अपेक्षाभंग झाला आहे. येणाऱ्या निवडणूक लक्ष्यात घेता मोदी सरकार शेतकऱ्यांना खुश करण्याची संधी नक्कीच गमावणार नाही अशा चर्चा सुरु होत्या, मात्र, याबाबत कोणताही निर्णय झाला नाही.

अनेकांना प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ होण्याची शेतकऱ्यांची आशा होती. पण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024 च्या अंतरिम अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही घोषणा न करता शेतकऱ्यांची निराशा केली. 2019 मध्ये अर्थसंकल्पात ही योजना सुरू करण्यात आली होती आणि तेव्हापासून रक्कम वाढवण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, तो अर्थसंकल्प देखील अंतरिम अर्थसंकल्प होता आणि काल मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा अंतरिम अर्थसंकल्प आहे.

PM किसान योजनेचा लाभ 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना!

देशातील 9 कोटींहून अधिक लहान शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत, केंद्र सरकारकडून दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत दर चार महिन्यांनी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. ऑगस्ट-नोव्हेंबर 2023 या कालावधीसाठी 9,07,52,758 शेतकऱ्यांना 2,000 रुपयांच्या हप्त्यांमध्ये PM किसान सन्मान निधी मिळाले आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरली आहे आणि त्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करते.