Budget 2024: आपल्यापैकी प्रत्येकजण सध्या येणाऱ्या अर्थसंकल्पाची म्हणजेच बजेटची वाट पाहत आहे. केवळ तीन महिन्यांसाठी सादर होणार हा अर्थसंकल्प प्रत्येकाची उत्सुकता ताणून आहे, यातूनच आर्थिक बाजू किती महत्वाची असते याचा अंदाज लावता येतो. मात्र बजेट म्हटलं की केवळ कोणत्या मंत्रालयाला किती पैसे मिळाले, ऐकूण नियोजन कसं आहे एवढं जाणून घेणं पुरेसं आहे का? नक्कीच नाही, कारण कोणताही विषय जर का व्यवस्थित समजून घ्यायचा असेल तर त्याची पार्श्वभूमी माहिती असली पाहजे, आणि हाच नियम बजेटच्या बाबतीतही लागू होतो, म्हणूनच आज येणाऱ्या बजेटबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया ज्यामुळे तुम्हाला बजेट समजून घ्यायला आणखीन मदत मिळेल.
अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे काय? (Budget 2024)
खरं तर अर्थसंकल्प हा संपूर्ण आर्थिक वर्षासाठी तयार केला जातो, ते संपूर्ण वर्षाचे नियोजन असते. मात्र आत्ताचा हा काळ निवडणुकांचा आहे आणि मे महिन्यापर्यंत देशात सत्तापालट झालेला असेल, जुन्या सरकारने घेतलेले निर्णय नवीन सरकारसाठी बोजा बनू नये म्हणून हा अर्थसंकल्प तयार केला जातो, फार कमी काळासाठी वैध असणाऱ्या या अर्थसंकल्पाला अंतरिम अर्थसंकल्प म्हटलं जातं. अगदीच काही काळासाठी वैध असला तरीही दोन सरकारांमध्ये मेळ साधण्याचं काम हा अर्थसंकल्प करणार आहे, म्हणून बाकी अर्थसंकल्पांप्रमाणे याची देखील तेवढीच खबर ठेवली पाहिजे. 1 फेब्रुवारी रोजी निर्मला सीतारामन म्हणजेच आपल्या अर्थमंत्री त्यांच्या कारकिर्दीतला 6 वा अर्थसंकल्प प्रस्तुत करतील आणि यानंतर त्या आणि मोरारजी देसाई एकाच पट्टीत येऊन बसणार आहेत.
भारतीय अर्थसंकल्पाचा इतिहास काय?
भारतीय अर्थसंकल्पाचा इतिहास 160 वर्षांहून अधिक जुना आहे. 1857 च्या क्रांतीनंतर, जेव्हा ब्रिटिश सरकारनं भारताचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेतला, तेव्हा भारताचा पहिला अर्थसंकल्प 7 एप्रिल 1860 रोजी सादर करण्यात आला. त्यावेळी, अर्थसंकल्प हा केवळ एक कागद होता ज्यामध्ये सरकारच्या उत्पन्न आणि खर्चाची माहिती दिलेली होती. स्वातंत्र्यानंतर, भारतातील पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी तत्कालीन अर्थमंत्री आर.के. षण्मुखम शेट्टी यांनी सादर केला (Budget 2024) आणि यानंतर अर्थसंकल्पातून अधिक तपशीलवार माहिती दिली जाऊ लागली. भारतीय अर्थसंकल्प हा देशाच्या आर्थिक धोरणाचे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. या दस्तऐवजाच्या माध्यमातून सरकार आपल्या आर्थिक धोरणांबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचवते.
BUDGET हा शब्द इंग्रजीमध्ये प्रचलित असला तरी, तो फ्रेंच भाषेतून आला आहे. फ्रेंच भाषेत ‘bougette’ या शब्दाचा अर्थ ‘लेदर ब्रीफकेस’ असा होतो, BUDGET याच शब्दावरून तयार झाला असावा. पूर्वी अर्थसंकल्प लेदर ब्रीफकेसमधून आणला जायचा. मात्र, निर्मला सीतारामन यांनी 2019 मध्ये अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्याचे स्वरुप बदललेआणि आता अर्थसंकल्प लाल रंगाच्या बहिखात्यातून आणला जातो.