Budget 2024 : अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया माहित आहे का? शेवटपर्यंत पाळली जाते गुप्तता

Budget 2024: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2024 रोजी मोदी सरकारच्या कारकिर्दीतील शेवटचे बजेट प्रस्तुत करणार आहेत. मात्र सुरुवातीलाच मंत्रालयाकडून या बजेटकडून विशेष अपेक्षा ठेवली जाऊ नये अशी माहिती देण्यात आली होती आणि याचे प्रमुख कारण म्हणजेच येणाऱ्या निवडणूका आहेत. आपल्या देशात सध्या सर्वत्र निवडणुकांचं वारं वाहतंय, आणि म्हणूनच अर्थमंत्रालयाकडून तयार करण्यात येणाऱ्या बजेटची मर्यादा काही दिवसांसाठीच वैध ठरवण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात कुठल्याही पक्ष्याच्या बाजूने मतं फिरू नयेत म्हणून बजेटचा कार्यकाळ सर्वात कमी असा निश्चित करण्यात येतो. आपल्या घरात जसे पैश्यांच्या खर्चाचे नियोजन केले जाते त्याचप्रमाणे भारत सरकारकडून संपूर्ण देशाचा व्यव्यहार सांभाळण्यासाठी बजेट सादर केले जाते. मात्र कधी हि बजेट तयार करण्याची प्रक्रिया कशी असते याबद्दल माहिती मिळवली आहे का? चला तर मग जाणून घेऊया…

फेब्रुवारीत निर्मला सीतारामन सादर करणार अर्थसंकल्प: (Budget 2024)

व्होट ऑन अकाउंट असे नाव देण्यात आलेल्या या बजेटचे प्रस्तुतीकरण 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्रालयाकडून करण्यात येणार आहे. येणाऱ्या आर्थिक वर्षाच्या काही महिन्यांसाठी सरकारच्या खर्चाच्या प्रस्तावाला संसदेची मंजूरी मिळवण्यावर आता लक्ष केंद्रित केले जाणार आहे. वर्ष 2024 मध्ये एप्रिल आणि मे महिन्यात देशात निवडणूक होतील, ज्यानंतर नवीन सरकार स्थापन केले जाईल आणि मग नवीन सरकारचे अर्थमंत्रालय पुढील महिन्यांसाठी बजेट तयार करेल. देशात सादर होणाऱ्या बजेटमध्ये सरकार संबंधित आर्थिक वर्षाचा महसूल आणि खर्च यांचा संदर्भासह तपशील मांडला जातो तसेच सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सरकारकडून काही योजना राबवल्या जातात. सरकारकडून सादर करण्यात येणारा अर्थसंकल्प हा सरकारच्या अर्थव्यवहारांबद्दल माहिती देणारा महत्वाचा दस्तऐवज असतो (Budget 2024). यावरूनच सरकार नेमकं कोणत्या घटकांवर लक्ष केंद्रीत करत आहे याची कल्पना येते.

अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया:

सरकारडून बजेट तयार करण्याची तयारी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत सुरु होते. यामध्ये, येणाऱ्या आर्थिक वर्षाच्या आर्थिक घडामोडींबद्दल आढावा घेतला जातो. त्याआधी सर्व मंत्रालयांसोबत त्यांच्या खर्चाचा आढावा घेतला जातो तसेच वरिष्ठ अधिकारी नीती आयोग या विषयांवर चर्चा करतात. अर्थ मंत्रालय सर्व मंत्रालयांशी चर्चा करून त्यांना प्रश्न विचारते, आणि त्याला योग्य वाटल्यास कोणत्याही मंत्रालयाचा अंदाज कमी देखील करते. आर्थिक वर्षासाठी बजेट तयार करण्याआधी मंत्रालयाकडून विविध तज्ज्ञांचे मत घेऊन त्यावर विचार केला जातो तसेच विविध उद्योगांच्या प्रतिनिधी संघटनांकडून केंद्रीय अर्थ संकल्पाबाबत मत मागवले जाते. बजेट (Budget 2024) बनवण्याचं काम नॉर्थ ब्लॉकमध्ये केलं जातं. अर्थ मंत्रालयातील विशिष्ठ अधिकाऱ्यांना एकत्र कडून एक विशेष टीम तयार केली जाते. लक्ष्यात घ्या कि देशाचे बजेट हा एक गुप्त दस्तएवज असतो म्हणून त्यासंबंधात सर्व प्रकारची गुप्तता शेवटपर्यंत पाळली जाते.