Budget 2024 : कधीकाळी संध्याकाळी 5 वाजता सादर व्हायचं देशाचं बजेट; ही परंपरा कोणी मोडली आणि का?

Budget 2024 : फेब्रुवारी महिन्यात मोदी सरकारच्या अंतर्गत अर्थ मंत्रालयाकडून बजेट सादर केलं जाणार आहे. आत्तापर्यंत मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामधील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाच वेळा भारताचं बजेट सादर केलं आहे. भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर बजेट तयार करण्याच्या प्रक्रियेत अनेक बदल घडवण्यात आले. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेल्या भारताला सुरुवातीच्या काळात अर्थव्यवस्था घडवण्यावर लक्ष केंद्रित करायचे होते, मात्र आज आपल्याला अर्थव्यवस्था सुधारायची आहे व म्हणूनच या मोठ्या कालखंडात बनवण्यात आलेले बजेटचं स्वरूप देखील बदलेलं आहे. काही वर्षांपूर्वी देशाचं बजेट हे संध्याकाळी 5 वाजता सादर केलं जायचं पण आता ही वेळ बदलून, बजेट सादर करण्याची नवीन वेळ सकाळी 11 अशी ठरवण्यात आली आहे. देशात हे बदल कसे घडले जाणून घेऊयात…

बजेट सादर करण्याची वेळ का बदलली? (Budget 2024)

सुरुवातीला देशाचं बजेट संध्याकाळी 5 वाजता सादर केलं जायचं, जे कि आता सकाळी 11 वाजता का सादर केला जात आहे. खरंतर जुन्या काळात आपण इंग्रजांनी घालून दिलेल्या पायंड्यांचा स्वीकारला होता व म्हणूनच बजेट हे संध्याकाळी 5 वाजता सादर केलं जायचं. मात्र वर्ष 1999 मध्ये यात बदल घडवून आणण्यात आले. ब्रिटन आणि भारत या दोन्ही देशांमध्ये वेळेचा फरक असल्यामुळे ब्रिटनमध्ये 11:30 च्या वेळी भारतात संध्याकाळचे 5 वाजलेले असायचे. परिणामी भारतात संध्याकाळी 5 वाजता बजेट सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

बजेट सादर करण्याची वेळ कोणी बदलली?

वर्ष 2001 मध्ये देशात NDA ने सरकार स्थापन केलं होतं व या अंतर्गत अटल बिहारी वाजपेयी हे देशाचे माननीय पंतप्रधान होते. वाजपेयींच्या मंत्रिमंडळात बजेट सादर करण्याची वेळ बदलण्यात आली, तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पहिल्यांदा संध्याकाळी 5 ऐवजी देशाचं बजेट सकाळी 11 वाजता सादर केलं. त्यानंतर 2004 मध्ये बदललेल्या सरकारने सुद्धा जुन्या सरकारची री पुढे ओढली, आणि आता हीच संकल्पना भारतात कायमची रुजू झाली आहे.

मोदी सरकारच्या अंतर्गत दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात येणाऱ्या बजेटची तारीख बदलून 1 फेब्रुवारी अशी करण्यात आली. यामुळेच मोदी सरकारने जुन्या ब्रिटिश परंपरेला संपूर्णपणे पूर्णविराम दिला आहे. तसेच सरकारने आता सामान्य बजेटमध्ये रेल्वेच्या बजेटचा ही समावेश केलाय. सरकारला जुनी रेल्वे बजेटची (Budget 2024) परंपरा संपुष्टात आणण्याची कल्पना तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून सुचवण्यात आली होती.