Business Success Story : ‘हा’ चहावाला आहे करोडपती; अमेरिकेतील नोकरी सोडून आज चालवतोय करोडोंची कंपनी

Business Success Story: आपल्या दिवसाची सुरुवात ही सकाळच्या चहानेच होते आणि संध्याकाळ चहाशिवाय अपुरी असते. कदाचित आपल्या आजूबाजूला चहाचे एवढे प्रेमी आहेत म्हणूनच प्रत्येक कानाकोपऱ्यात आणि रस्त्याच्या बाजूला चहाची एखादी टपरी तरी पाहायला मिळतेच. जिथे जावं तिथे चहाचं दुकान पाहायला मिळतं आणि म्हणूनच भारतात चहाची सर्वात मोठी बाजारपेठ तयार झाली आहे. आज आपण अशा एका उद्योजकाबद्दल जाणून घेऊया ज्याने स्वतःचा चहाचा व्यवसाय सुरू करून, वेळप्रसंगी काही अंशी धोका पत्करून सतत परिश्रमांचा मार्ग धरून ठेवला. सध्या आपल्या देशात स्टार्टअप बद्दल अनेकांच्या मनात इच्छा जागृत होत आहे, खास करून तरुणांना स्टार्टअप विषयी अधिकाधिक आपुलकी वाटतेय, आणि म्हणूनच आजची ही गोष्ट सुद्धा अशाच एका जिद्दी तरुणाबद्दल आहे..

चहाचा व्यवसाय सुरू करून बनला उद्योगपती: (Business Success Story)

IIT मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिकेतील भल्या मोठ्या पगाराची नोकरी सोडून भारतात परतलेल्या आणि इथे येऊन चहाच दुकान सुरू करून आज दरवर्षाला दोन हजार कोटी रुपये कमावणाऱ्या युवकाची ही गोष्ट आहे. चायोस या कंपनीचे सहसंस्थापक नितीन सलुजा हे आज आपल्यापैकी अनेकांना माहिती असतीलच. अत्यंत कठोर परिश्रम आणि इच्छाशक्तीच्या जोरावर सलोजा यांनी चहाचा स्टार्टअप सुरू करून दाखवला. या स्टार्टअप मध्ये त्यांना मित्र राघव वर्मा याची देखील मदत मिळाली होती आणि दोन्ही मित्रांनी एकत्र येऊन चायोस या कंपनीची सुरुवात केली आणि सध्या ही कंपनी भरपूर यश कमावत आहे.

IT मधून मेकॅनिकल इंजीनियरिंग(Mechanical Engineering) ची पदवी घेतल्यानंतर नितीन सलुजा हे अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीत काम करत होते परदेशात तब्बल 5 वर्ष नोकरी केल्यानंतर एक दिवशी त्यांनी या नोकरीवर कायमचं पाणी सोडलं आणि भारतात परत यायचा निर्णय घेतला. सर्वांनाच माहिती आहे की भारतात चहाला सर्वात अधिक पसंत केलं जातं. कॉफी हा काही अर्थाने चहाचा एक पर्याय जरी असला तरी चहा ही आजही अनेकांची पहिली पसंत आहे व म्हणूनच चहाच्या माध्यमातून एक ब्रँड सुरू केला जाऊ शकतो असं म्हणून दोन्ही मित्रांनी एकत्र येऊन वर्ष 2012 मध्ये गुरुग्राम इथे पहिला कॅफे उघडला.

या कंपनीची खासियत काय तर इथे ग्राहकांना विविध प्रकारचे चहा प्यायला मिळतात. यांपैकी मसाला चहा, औषधी वनस्पती मिसळून तयार केलेला चहा असे प्रकार अनेक ग्राहकांचं लक्ष आकर्षित करण्यात यशस्वी ठरले आहेत(Business Success Story). आत्ताच्या घडीला समोर आलेल्या माहितीनुसार वर्ष 2022 पर्यंत चायोसचे देशभरात जवळपास 200 आउटलेट असून येत्या काही वर्षात याचा आकडा 1000 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.