शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा कोट्यवधींच्या कंपनीचा मालक होतो; डॉ. रवी पिल्लई यांचे यश नक्कीच तुम्हाला प्रेरणा देईल

बिझनेसनामा ऑनलाईन । जगात कष्टाशिवाय फळ मिळत नाही असं म्हटलं जाते. तुमच्यामध्ये मेहनतीची तयारी असेल तर तुम्हाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुम्ही अगदी गरीब असाल तरीही कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर श्रीमंत बनू शकता. अशीच एक व्यक्ती म्हणजे डॉ. रवी पिल्लई, ज्यांनी आपल्या व्यवसायाच्या जोरावर संपूर्ण जगात भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आणि आज ते कट्टर मुस्लिम देश असलेल्या दुबईतील श्रीमंत व्यक्तींच्या नावात गणले जातात. गरीब शेतकरी कुटुंबात जन्म झालेली व्यक्ती इतकी मोठी व्यावसायिक कशी झाली याबाबतच आज आपण जाणून घेऊया.

रवी पिल्लई केरळमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रविज रिसॉर्ट्स हॉटेल चेनचे मालक आहेत. त्यांच्या कंपनीचे केरळमध्ये अनेक 5 स्टार रिसॉर्ट्स आहेत. डॉ. पिल्लई यांच्याकडे द लीला ग्रुप आणि वेलकम हॉटेल्स सारख्या इतर अनेक हॉटेल चेनमध्येही मोठी हिस्सेदारी आहे. केरळमधील कोल्लममध्येही त्यांचा आरपी मॉल आहे. परंतु हे सगळं त्यांनी स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर कमवलं आहे. कारण जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा ते जन्मताच श्रीमंत नव्हते.

गरीब शेतकरी कुटुंबात जन्म-

केरळमधील कोल्लम या छोट्याशा गावात रवी पिल्लई यांचा जन्म झाला होता. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रवी यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी चिट फंड कंपनी सुरू करून व्यवसायात नशीब आजमावले. त्यानंतर त्यांनी अभियांत्रिकी कंत्राटी व्यवसाय सुरू केला आणि केरळमधील फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड, हिंदुस्थान न्यूजप्रिंट लिमिटेड आणि कोचीन रिफायनरीज साठी काम केलं. परंतु त्याकाळी कामगारांच्या संपामुळे त्यांना हा व्यवसाय बंद करावा लागला. पण हार मानतील ते पिल्लई कसले, त्यांनी 1978 मध्ये सौदी अरेबियाचा रस्ता धरला आणि तेथे बांधकाम आणि व्यापार व्यवसाय सुरू केला. पिल्लई यांनी संयुक्त अरब अमिराती, कतार आणि बहारीनसह इतर देशांमध्ये त्यांच्या व्यवसायाचा विस्तार केला.

नंतर अब्जावधी डॉलर्सच्या आरपी ग्रुपची स्थापना केली .एका फायनान्स कंपनीसोबत आरपी ग्रुप सुरू केल्यानंतर डॉ. रवी पिल्लई यांनी केरळमध्ये हॉटेल आणि रिसॉर्ट्सचा व्यवसाय सुरू केला. यानंतर त्यांनी आपल्या हॉटेल ग्रुपचा विस्तार केला. त्यांचा केरळमधील कोल्लम येथे आरपी मॉलही आहे.

डॉ. रवी पिल्लई यांच्या संपत्तीबाबत सांगायचं झाल्यास, फोर्ब्सच्या अहवालानुसार, आज त्यांची रिअल टाइम नेट वर्थ $3.2 अब्ज इतकी आहे. आज त्यांच्याकडे करोडो रुपयांच्या महागड्या गाड्या आहे, 100 कोटींचे एअरबस हेलिकॉप्टरही आहे, हाताखाली माणसे आहेत, त्यांची जीवनशैली अतिशय शाही आहे. पण त्यांनी हे सर्व स्वतःच्या कष्टाच्या जोरावर मिळवलं आहे. एका गरीब शेतकरी कुटुंबातील व्यक्ती कट्टर मुस्लिम देश असलेल्या दुबईतील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरतो ही नक्कीच भारतीयांची छाती अभिमानाने फुगवणारी गोष्ट आहे.