Cryptocurrency Fraud Case : तुम्ही क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणूक केली आहे का? नक्कीच केली असेल कारण आपल्याला कमावलेला पैसा कोणत्या-ना-कोणत्या कारणाने गुंतवायचा असतो आणि सध्याची परिस्थिती बघता, तसेच येणाऱ्या भविष्याचा अंदाज घेता प्रत्येकानेच पैश्यांची गुंतवणूक ही केलीच पाहिजे. रात्रंदिवस मेहनत करून कमावलेला हा पैसा साठवणं आणि त्यावर योग्य तो व्याज मिळवणं हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. दिवस सरता-सरता अनेक तांत्रिक बदल होत गेले आणि गुंतवणुकीच्या पद्धती देखील बदलल्या, सध्या परदेशातून आलेल्या क्रिप्टो करन्सी या पद्धतीचा वापर करून अनेक लोकं गुंतवणुक करीत आहेत. तुम्ही देखील क्रिप्टो करन्सीचे गुंतवणूकदार असाल तर ही बातमी सविस्तर वाचाच, कारण टेक्नॉलॉजी जेवढी जोमाने प्रगती करते तेवढ्याच जोमाने आजूबाजूच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला देखील ऊत येतोय.
अलीकडेच पुणे शहरात असाच एक प्रसंग घडला असून क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणूक करण्याचे आश्वासन देऊन एका सर्वसाधारण माणसाला तब्बल 10 लाखांचा गंडा घालण्यात आला होता. आपण सामान्य माणूस असल्यामुळे एकेक पैसा हा कष्ट करून कमावला जातो आणि फसवणुकीचा शिकार झाल्याने हा पैसा क्षणार्धात नाहीसा होणे ही आपल्यासाठी कुठल्याही धक्क्यापेक्षा कमी गोष्ट नाही. काय आहे पुण्यातील एकूण प्रकरण जाणून घेऊया…
हडपसर मधल्या प्रकरणाची चौकशी सुरु: (Cryptocurrency Fraud Case)
गुंतवणूक ही चांगल्या परतव्याच्या आशेने केली जाते. जिथून चांगला परतावा, तिथे गुंतवणूक करण्यासाठी आपण नेहमीच इच्छुक असतो. याच विचारसरणीचा फायदा घेत पुण्यात क्रिप्टो करन्सीचे आमिष दाखवून एका माणसाला तब्बल दहा लाख रुपयांचा गंडा घातला आहे. हडपसर येथे बुधवारी पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंद झाल्यानंतर माध्यमांना सदर प्रसंगाची माहिती मिळाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी बुद्रुक परिसरात राहणाऱ्या एका चाळीस वर्षीय व्यक्तीने ही तक्रार नोंदवली आहे. तक्रार नोंदवताना तो फिर्यादी म्हणतो की, एका अनोळखी क्रमांकावरून व्हाट्सअप(Whatsapp) वर त्याला एक मेसेज पाठवण्यात आला, यामध्ये त्याला क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणूक करण्याचे अमिश दाखवण्यात आले. फसवणुकीला बळी पडलेल्या या माणसाला त्वरित त्या गुन्हेगारांनी एका व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करून क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणूक केल्याने भरपूर फायदा मिळेल, असे सांगून एकूण 9 लाख 92 हजार रुपये भरण्यास प्रवृत्त केलं.
एवढा सगळा प्रसंग घडत असताना देखील फिर्याद्याला आपल्यासोबत काही चुकीचं घडत आहे याचा भासही झाला नाही. पुढे त्याला ते पैसे विड्रॉव करत असताना अडचणींचा सामना करावा लागताच त्यांने गुन्हेगारांशी याविषयी चर्चा केली असता, त्यांनी अजून पैसे भरून जुने पैसे मिळवावे लागतील अशी माहिती दिली. आता मात्र आपली फसवणूक होते आहे (Cryptocurrency Fraud Case) हे फिर्यादीच्या लक्षात येऊन त्यांनी त्वरित हडपसर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आणि सध्या पोलीस या प्रकाराची कसून तपासणी करत आहेत.
आपण कितीही प्रगती करत असलो तरी देखील जगात वावरताना तुम्हाला सावध राहावंच लागेल, तुम्ही ज्या टेक्नॉलॉजीचा वापर करतात ती तुमच्याच अंगाशी येणार नाही ना!! याची खात्री करून घेतली पाहिजे. सरकार तसेच पोलीस वेळोवेळी आपल्याला अशा गुन्हेगारी प्रवृत्ती पासून सावध राहण्याचा सल्ला देत असतात. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करत सावध राहणं हे केवळ आपल्याच हातात आहे. त्यामुळे यापुढे कधीही पैश्यांचे अमिश दाखवणाऱ्या अशा चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण कदाचित यानेच गुन्हेगारी प्रवृत्तीला जबर आळा बसवला जाऊ शकतो.