Deepinder Goyal: Zomato या Food Delivery कंपनीचे सह-संस्थापक आणि CEO दीपिंदर गोयल हे सहसा मुलाखती देत नाहीत, ते गप्प स्वभावाचे आहेत हे सर्वांना माहीतच आहे. पण नुकतीच त्यांनी Business Today ला मुलाखत दिली आणि या मुलाखतीत त्यांनी Zomato ला इतर व्यवसायांपासून वेगळं काय बनवतं, Blinkit अधिग्रहणांबद्दल आणि त्यांच्या व्यवसाय मॉडेलबद्दल भरपूर गोष्टी सांगितल्या. त्यांच्या या मुलाखतीमुळे अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया, Zomato च्या यशाचं रहस्य..
Zomato बद्दल काय म्हणतायत गोयल? (Deepinder Goyal)
आजच्या वेगवान आणि बदलत्या वातावरणात टिकून राहणं हेच यशस्वी होण्याचं रहस्य आहे असं Zomato चे संस्थापक दीपिंदर गोयल म्हणतात. त्यांच्या मते, व्यवसायाच्या वाढीसाठी दीर्घकालीन नियोजन करण्यापेक्षा बदलत्या परिस्थितीनुसार झपाट्याने वाढत राहणं आवश्यक आहे. हे खरं तर स्टार्टअप्ससाठीच नव्हे तर कोणत्याही व्यवसायासाठी हीच गोष्ट लागू होते, याचं प्रमुख कारण म्हणजे आजच्या जगात वातावरण इतक्या वेगात बदलतं आहे की दीर्घकालीन नियोजन अनेकदा चुकीचं ठरू शकतं. त्यामुळे या परिस्थितीत आपण वेगवान बनत बदलत्या परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे.
दीपिंदर गोयल यांचा मंत्र काय?
दीपिंदर गोयल यांना भूतकाळात न रमता वर्तमानावर लक्ष केंद्रित करायला आवडतं. ते म्हणतात की आपण ज्या सकारात्मक गोष्टी शिकलो आहोत त्या आपल्या वर्तमानाचा भाग आहेत आणि त्यांचा सकारात्मक परिणाम आपल्या भविष्यावर होत असतो. त्यांना टीममधील लोकांना एकत्र ठेऊन काम करण्यासाठी गतीशील आणि सकारात्मक वातावरण आवडतं.
Blinkit बद्दल व्यक्त केलाय ठाम विश्वास:
दीपिंदर गोयल यांचा विश्वास आहे की Blinkit चा व्यवसाय Zomato पेक्षा मोठा होईल. Blinkit कंपनी विकत घेणे हा ग्राहकांसाठी घेतलेला निर्णय होता, ते स्पष्टपणे पुढे सांगतात की हे अधिग्रहण त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओचा भाग मुळीच नव्हता, तर केवळ ग्राहकांना वेगवान सेवा देण्याची इच्छा असल्याने त्यांनी कंपनीची जबाबदारी स्वीकारली.
Zomato कडे लोकसंख्येची आणि वाहतूक दूरस्थितीची माहिती आहे आणि त्या माहितीचा वापर Blinkit स्टोअर-मॅपिंगसाठी केला जातो. ही गोष्ट ऐकायला सोपी वाटत असली तरीही आज Blinkit ने कमावलेलं यश कठोर परिश्रमांचा परिणाम आहे, 12 महिन्यांपूर्वी केलेल्या कामाचे दर्शन आहे असे दीपिंदर गोयल (Deepinder Goyal) यांनी मुलाखतीत म्हटले.