Digital Payments : डिजिटल पेमेंट्सवर अधिक पैसे कापले जातायत? ‘हे’ पर्याय वापरून पहा..

Digital Payments : डिजिटल जगात वावरताना हातात मोबाईल आणि एक चांगलं इंटरनेट कनेक्शन मिळालं म्हणजे लोकं सुस्कारा सोडतात. खरोखरच या तांत्रिक बदलांमुळे माणसाचं आयुष्य अनेक बाजूंनी सोपं झालंय. सर्वात महत्वाचं म्हणजे यामुळे आपला वेळ वाचतोय. डिजिटल पेमेंट्स बद्दल बोलायचं झालं तर माणसाला आता पैश्याची चिंता उरलेली नाही. हातात मोठाली रक्कम घेऊन जाणं म्हणजे एकार्थाने धोक्याचं, कारण कुठे आणि कोणाची गुन्हेगारी प्रवृत्ती डोकं वर काढेल काहीच सांगता येत नाही. पैसे हा आपण कष्टाने कमावलेला असतो, त्यासाठी दिवस-रात्र मेहेनत केलेली असते आणि अश्याच पैश्याची चोरी झाली त्या बिचाऱ्या माणसावर काय परिस्थिती ओढवेल याचा आपण विचारही करू शकत नाही.

इंटरनेटच्या साहाय्याने कारण्यात येणाऱ्या व्यवहारांमध्ये अधिकवेळा PhonePe, Googlepay, Paytm इत्यादींचा वापर केला जातो. बँक अकाउंट असलेल्या प्रत्येक माणसाच्या हातात निदान यातलं एक एप तरी असतंच. पण जेवढी तांत्रिक प्रगती तेवढाच धोका देखील जास्ती, नाही का? दर दिवशी इंटरनेटवर होणाऱ्या चोऱ्यांचं प्रमाण वाढतंय, सरकार अश्या गुन्हेगारी वृत्तीवर आळा घालण्याचा प्रयत्न करीत असले तरीह हवे तसे नियंत्रण अद्याप तरी बसलेले नाही.

Gpay, PhonePe कापतायत अधिक पैसे (Digital Payments):

केवळ वाढत्या गुन्ह्यांमुळेच नाही तर या मोठाल्या कंपन्यांकडून कापल्या जाणाऱ्या अधिक पैश्यांमुळेही ग्राहक त्रस्त झाले आहेत. महिन्याला जर का आपण इंटरनेट पेमेंटचा (Digital Payments) वापर सर्वाधिक करत असू तर तो मोबाईल रिचार्ज करण्यासाठी. मोबाईल हि आजच्या जगातली सर्वात महत्वाची गोष्ट आहे, ऑफिसमधली कामं सुद्धा आता मोबाईलच्या साहायाने केली जातात. कदाचित माणसाची हीच गरज कंपन्यांनी ओळखली आहेत आणि म्हणून ते मोबाईल रिचार्जवर अधिक पैसे आकारात आहेत. 50 रुपयांपेक्षा अधिक बिलावर अतिरिक्त शुल्क आकारले जाईल अशी माहिती कंपन्यांनी अगोदरच दिली होती. सध्या PhonePe वर 50 ते 100 रुपयांपर्यंतच्या आर्थिक व्यवहारांवर 1 रुपयाची फी आकारली जाते, तर 1000 रुपयांपेक्षा अधिक व्यवहारांवर 2 रुपये फी आकारली जाते. पण जर का तुम्हाला हे अधिक पैसे भरायचे नसतील तर वेगळे काही मार्ग अवलंबले जाऊ शकतात, ज्यांच्या मदतीने हि फी टाळता येणं शक्य आहे.

यावर काही पर्याय आहे का?

घरबसल्या काही सोपी कामं करता यावी तसेच अतिरिक्त खर्चापासून सूट मिळावी म्हणून आपण इंटरनेटच्या मदतीने मोबाईल रिचार्ज करण्याची पद्धत स्वीकारली होती. मात्र आता इथेही काही अंशी पैसे कापले जात असल्याने सामान्य जनता त्रस्त आहे. पण यावर पर्यायी मार्ग आहे का? अतिरिक्त खर्च टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पैश्यांचा व्यवहार करणे. तुम्ही जर का वीज किंवा पाणी बिल भरणार असाल तर तुमच्या राज्य सरकारच्या अधिकृत साईटवर जाऊन ते बिल भरा.

Jio सिमकार्ड धारकाने एपच्या मदतीने मोबाईल रिचार्ज केल्यास कंपनी यावर कोणतेही अधिक पैसे कापणार नाही, तसेच इतर टेलिकॉम कंपन्याही ग्राहकांकडून कोणतेही अधिक पैसे घेत नाहीत. अनेक मंडळी तर Amazon Payचा वापर करून बिल भारतात कारण इथे कोणतेही अधिक पैसे कापले जात नाहीत. या व्यतिरिक्त Cred हे एक मोबाईल अँप्लिकेशन आहे, ज्यावर बिल भरण्यासाठी किंवा रिचार्ज करण्यासाठी एक्सट्रा पेमेंट करावं लागत नाही त्यामुळे असे हे पर्याय नक्कीच तुमच्या फायद्याचे ठरू शकतात.