Digital Rupee । सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारे आपण, शक्य तेवढ्या सर्व गोष्टींमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून जीवन अधिक सोपं बनवण्याचा प्रयत्न करतो. आजकाल घरबसल्या अनेक गोष्टी साध्य करता येतात ज्याची कदाचित कल्पना देखील आपण काही वर्षांपूर्वी केली नसेल. ऑनलाइन बँकिंग किंवा डिजिटल रुपये हा त्यातीलच एक महत्त्वाचा घटक आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा यांसारख्या बँका देशात अधिकाधिक ओळखल्या जातात कारण त्यांचा ग्राहक वर्ग भला मोठा आहे. या बँकांनी सादर केलेल्या अहवालाप्रमाणे आपल्या देशात भल्या मोठ्या प्रमाणात डिजिटल रुपयांचा(Digital Rupee) वापर करण्यात आला आहे. नेमकी काय आहे एकूण बातमी जाणून घेऊया….
देशात झाला डिजिटल रुपयांचा भरपूर वापर: (Digital Rupee)
सार्वजनिक क्षेत्रातील कर्जदार स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि बँक ऑफ बरोडा(BOB) यांना सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) किंवा डिजिटल रुपयांसाठी (Digital Rupee) ग्राहकांकडून भरगोस प्रतिसाद मिळाला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने 1 डिसेंबरपासून 400,000 लाख वापरकर्त्यांकडून 900,000 हून अधिक व्यवहारांची नोंद केली आहे. बँक ऑफ बडोदासाठी CBDC वापरकर्त्यांची संख्या 250,000 वर पोहोचली असल्याने या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत CBDC आकडा 1 मिलियन पर्यंत पोहोचवणे असे बँक ऑफ बरोडाचे उद्दिष्ट आहे. ही बँक म्हणते की प्रत्येक दिवशी त्यांच्या व्यवहारामध्ये 2,000 पेक्षा अधिक वाढ होत आहे.
रिझर्व बँक ऑफ इंडिया 1 डिसेंबर 2022 मध्ये सुरू केलेल्या CBDC योजने अंतर्गत या वर्षी डिसेंबरच्या अखेरपर्यंत दररोज 1 मिलियन CBDC व्यवहार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आत्तापर्यंत, 80 शहरांमध्ये 13 बँका CBDC योजनेत सहभागी झाल्या असून, RBIच्या म्हणण्यानुसार देशात सप्टेंबरपर्यंत दररोज सुमारे 15,000 डिजिटल रूपयांचे व्यवहार झाले आहेत. बँकांनी CBDC आणि युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) यांच्यात इंटरऑपरेबिलिटी लागू करण्यास सुरुवात केली आहे आणि म्हणूनच CBDC वापरकर्त्यांची संख्येत पुढे जाऊन लक्षणीयरीत्या वाढ होण्याची शक्यता आहे.