Dunzo Success Story : छोट्याश्या Whatsapp ग्रुपमधून उभा केला व्यवसाय, आज बनली 6400 कोटींची कंपनी

Dunzo Success Story : एखादा माणूस जर का यशस्वी झाला तर आपण त्याची वाहवा करतो, त्याच्या परिश्रमांना दाद देतो. पण या सगळ्यात अनेकवेळा दुसऱ्याच्या प्रवासातून शिकवण घेणं राहून जात असावं. मुकेश अंबानी यांना आपण देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखतो, मात्र कधीही त्यांच्याप्रमाणे मेहनत घेत यशाची शिखरं गाठावी असं स्वप्न पाहत नाही. मात्र याला काही व्यक्ती अपवाद ठरतात. कबीर बिस्वास हे यातीलच एक आहेत. Dunzo हे नाव तुम्ही ऐकलंच असेल, या एपच्या मदतीने अनेक वस्तू घरपोच आणून दिल्या जातात. पण तुम्हाला माहिती आहे का या व्यवसायाची सुरुवात केवळ एका छोट्याश्या व्होट्सएप ग्रुप द्वारे करण्यात आली होती. काय आहे कबीर यांची गोष्ट जाणून घेऊया…

कोण आहेत कबीर बिस्वास?

Dunzo ची सुरुवात करणारे कबीर बिस्वास यांनी कंप्युटर सायन्स मधून पदवी मिळवली आहे. यानंतर MBA करण्याआधी त्यांनी नेमकी आवड कोणत्या क्षेत्रात आहे हे जाणून घेण्यासाठी एका प्लास्टिक फेक्टरीमध्ये देखील काम केलं होतं. त्यांचा जन्म 1984 सालचा, वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी आपल्या वडिलांना गमावलं, ते कायमचं. पण वडिलांनी कबीरसाठी पुरेशी रक्कम बाजूला काढून ठेवली होती, आणि म्हणूनच त्यांना निश्चिंत शिक्षण घेता आलं. हा डीलीव्हरीचा व्यवसाय सुरु करण्याआधी कबीर यांनी भारती एअरटेल लिमिटेड, विडियोकॉन टेलेकॅम्युनिकेशन लिमिटेड, Y2FC डिजिटल मिडिया प्रायवेट लिमिटेड यांसारख्या कंपन्यांमधून कामाचा अनुभव घेतला आहे.

कशी झाली डन्झोची सुरुवात? (Dunzo Success Story)

वर्ष 2015मध्ये Dunzo ची सुरुवात करण्यात आली होती. सुरुवातीला आसपासच्या भागांमध्ये त्यांची टीम वस्तू घरपोच नेऊन देण्याचं काम करायची. यासाठी त्यांनी एक व्होट्सएप ग्रुप देखील तयार केला होता. मेहनत आणि परिश्रम यांमुळे कबीर यांच्या एका छोट्या ग्रुपचे रुपांतर मोठ्या मोबाईल एप्लिकेशन मध्ये व्हायला सुरुवात झाली. आणि यातूनच डन्झोची प्रसिद्धी वाढू लागली. ग्राहकांना वेळेत आणि घरपोच मदत केल्याने ते खुश होतील हे कबीर जाणून होते, म्हणूनच त्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याचे प्रयत्न सुरु केले. सध्या डन्झो पुणे, मुंबई, हायद्राबाद , चेन्नई, जयपूर, बेंगळूरू, दिल्ली आणि गुरूग्राम यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये घरपोच वस्तू पोहोचवण्याचं काम करते. (Dunzo Success Story)

बंगळुरूच्या काही खास जागांपासून सुरुवात केलेला हा व्यवसाय आज भरपूर नाव कमावत आहे. या एपच्या मदतीने तुम्ही हॉटेलमधून जेवण, किराणा समान, औषधं यांसारख्या महत्वाच्या गोष्टी घरपोच मिळवू शकता आणि हाच व्यवसाय करत कंपनी दर महिन्याला लाखोंचा व्यवसाय करते. आत्तापर्यंत गुगलकडून फंडिंग मिळवणारी कबीर बिस्वास यांची Dunzo हि पहिलीच कंपनी ठरली आहे. आणि सध्या ती स्विगी आणि झोमाटोला सुद्धा बऱ्याच अंशी टक्कर देत आहे.