Elon Musk यांची डोकेदुखी वाढली; अनेक कर्मचाऱ्यांचा X ला रामराम

बिझनेसनामा ऑनलाईन : मागच्या अनेक दिवसांपासून Elon Musk हे संकटांच्या कचाट्यात सापडले आहेत. इलोन मस्क यांनी एक्स (X) म्हणजेच ट्विटर विकत घेतल्यापासून हि सोशल मीडिया कंपनी अनेक मोठ्या अडचणींचा सामना करत असल्याच्या चर्चा अनेक लोकांमध्ये सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी इलोन मस्क यांनी ज्यू आणि गोऱ्या लोकांमध्ये वाद निर्माण होऊ शकणाऱ्या एका ट्विटचे समर्थन केल्यामुळे अनेकांनी त्यांना विरोध दर्शवला तसेच कित्येक जाहिरातदार एक्स (X) हा प्लॅटफॉर्म सोडून निघून गेले. यानंतर इलोन मस्क यांना आता एक नवीन झटका बसला आहे तो म्हणजे एक्सच्या(X) सेल्स टीम मधील अनेक कर्मचाऱ्यांनी दिलेला राजीनामा. आज जाणून घेऊया की अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली की ज्यामुळे एक्सच्या(X) अनेक कर्मचाऱ्यांनी इलोन मस्क यांची कंपनी कायमची सोडण्याचा निर्णय घेतला आहे…..

इलोन मस्क यांची डोकेदुखी वाढली: (Elon Musk)

माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यांपासून एक्सच्या (X) सेल्स टीम मधल्या अनेक वरिष्ठ तसेच कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला सुरुवात केली आहे. कर्मचाऱ्यांना थांबवण्यासाठी इलोन मस्क यांनी बोनसचा चेक देखील देऊ केला होता मात्र तरीही कुठलाही कर्मचारी त्याच्या निर्णयावरून जराही डळमळताना दिसला नाही. चिंता करण्याची गोष्ट म्हणजे केवळ सेल्स टीम मधूनच नाही तर कंपनीच्या इतर विभागांमधून देखील मोठ्या प्रमाणात कर्मचारी कंपनी सोडण्याच्या मार्गावर आहेत.

या मागचं कारण काय?

इलोन मस्क (Elon Musk) हे खरंतर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि त्यांच्या कंपनीमध्ये काम करायला मिळणं हे कुठल्याही कर्मचाऱ्यासाठी स्वप्नापेक्षा कमी नाही. मात्र तरी देखील अशी दिग्गज कंपनी सोडून कर्मचारी एवढ्या मोठ्या प्रमाणात का मागे फिरत आहेत? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आणि याचे उत्तर ऐकून थक्क व्हाल, कारण कंपनीमध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांचं असं मत आहे की एक्स (X) या प्लॅटफॉर्मला येणाऱ्या दिवसात काहीही भविष्य असणार नाही, आणि म्हणून अशा शून्यात भविष्य असलेल्या कंपनीसोबत पैशांचे आमिष दाखवूनही कर्मचारी काम करायला तयार नाहीत. गेल्या वर्षात इलोन मस्क यांनी स्वतः मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात केली होती आणि आता चित्र एवढं बदललंय की कर्मचारी स्वतः इलोन मस्क यांची कंपनी सोडत आहेत.

झालेल्या प्रकारावरून अनेक लोकं याला विविध कारणे जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. कित्येक लोकांच्या मते कर्मचारी कंपनी सोडण्यामागे इतर कोणतेही कारण नसून स्वतः इलोन मस्क (Elon Musk) यांचा स्वभावच आहे. त्यांचा स्वभाव फटकळ असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या रागाला आता त्यांना सामोरं जावं लागत आहे. सध्या अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या जाहिराती एक्स (X) वर देणं बंद केलंय आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला यामुळे इलोन मस्क या जगप्रसिद्ध उद्योगपतीवर डोकं धरण्याची वेळ आली आहे.