बिझनेसनामा ऑनलाईन । EPFO म्हणजेच Employees’ Provident Fund Organisation यालाच मराठी मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना असे म्हंटले जाते. EPFO मध्ये देशातील ६ कोटी पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे खाते आहे. त्यामध्ये दर महिन्याला प्रत्येक कर्मचाऱ्याची ठराविक रक्कम जमा होत असते. यातून येणारी रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवली जाते. कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतर पीएफची रक्कम त्यांना दिली जाते. मात्र आता PF खातेधारकांना अधिक पैसे मिळणार असल्याचे बोलले जात आहे. EPFO याबाबत एक महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत असून लवकरच याबाबत मोठी घोषणा होऊ शकते. नक्की काय आहे हा निर्णय आणि यामुळे खरच पीएफ खातेधारकांना फायदा होणार आहे का हे आपण जाणून घेऊयात.
P.F मध्ये गुंतवणूक करताना आपण कधीच जास्त विचार करत नाही. खूप विश्वासाने आपण या मध्ये गुंतवणूक करत असतो. कारण EPFO हि सरकारी संस्था असल्याने येथे पैसा सुरक्षित राहतो असा जनमाणसात समज आहे. तसेच PF मधून व्याजाच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीवर परतावा मिळत असतो. आता EPFO पीएफ मधील फंडाबाबत एक महत्वाचा निर्णय घेणार असल्याचे समजत आहे. या निर्णयामुळे PF खातेधारकांना मिळणार पैसे वाढतील अशी शक्यता सांगण्यात येत आहे.
EPFO सध्या शेअर बाजारातील गुंतवणूक वाढवण्याचा विचार करत आहे. या संदर्भात मंजुरीसाठी लवकरच वित्त मंत्रालयाशी संपर्क साधेल असेही सूत्रांनी सांगितले आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या बैठकीत या संबंधीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, EPFO ETF द्वारे शेअर बाजारात वार्षिक ५-१५ टक्के गुंतवणूक करू शकते आणि उर्वरित रक्कम डेट सिक्युरिटीजमध्ये गुंतवली जाते. ETF रिडेम्पशनची रक्कम कशी गुंतवायची याबाबत कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. मात्र असे असले तरी अलीकडे पीएफ मधील गुंतवणूक सुरक्षित राहिलेली नाही असे अनेक कर्मचाऱ्यांना वाटत आहे. केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूक दारांच्या मनात खळबळ उडाली आहे. आपण भविष्यासाठी केलेली गुंतवणूक धोक्यात आली आहे असे कर्मचाऱ्यांना वाटत आहे.
जानेवारी २०२३ पर्यंत शेअर बाजारातील गुंतवणूक १०% होती तर अनुज्ञेय मर्यादा १५% आहे. EPFO ने सर्वात पहिल्यांदा २०१५-१६ मध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याची मर्यादा ५% होती, जी २०१६-१७ मध्ये १०% आणि नंतर २०१७-१८ मध्ये १५% करण्यात आली. ३१ मार्च २०२२ मधील आकडेवारी नुसार ETF च्या माध्यमातून १,०१,७१२. ४४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली . जी ११,००,९५३.६६ कोटी रुपयांच्या एकूण गुंतवणुकीच्या हे ९.२४% आहे.
शेअर बाजारातील गुंतवणूक हि जोखमीची असते . शेअर बाजाराला अनेक लोक जुगार असेही म्हणत असतात . आपण भविष्यासाठी जी गुंतवणूक करत आहोत ती सुरक्षित आहे का असा अनेक कर्मचाऱ्यांच्या मनात गोंधळ उडाला आहे. ईपीएफओला केंद्र सरकारने शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी परवानगी दिली तर त्याचा फटका या गुंतवणुकीला बसू शकतो, हे तर कर्मचाऱ्यांना चांगलेच कळते.