Export Ban In India : तांदूळ, गहू आणि साखरेच्या निर्यतेवरील बंदी कायम; अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वी सरकारची मोठी घोषणा

Export Ban In India : देशांतर्गत खाद्यपदार्थांच्या किमती वाढू नये यासाठी केंद्र सरकारकडून अनेक वस्तूंच्या निर्यातीवर काही निर्बंध लावण्यात आले आहेत. आपल्या देशाचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी अलीकडेच काही वस्तूंच्या निर्यातीवरील बंदी कायम राहण्याची घोषणा केली आहे. वाणिज्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार गहू, तांदूळ आणि साखरेच्या निर्यात वरील बंदी ही कायम राहणार आहे. गहू, तांदूळ आणि साखरेच्या निर्यातीबद्दल सरकारचा हा निर्णय पूर्णपणे पक्का असल्याने फेब्रुवारी महिन्यात जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पापूर्वीच सरकारची ही मोठी घोषणा म्हणावी लागेल. अद्याप सरकार देशात कोणत्याही प्रकारची निर्यात बंदी उठवण्याच्या विचारात नाही, तसेच निर्यातीवरची बंदी उठवण्याच्या बाबत कोणत्याही प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही. देशात गहू आणि साखरेची उपलब्धता पुरेशी आहे व म्हणूनच आपल्याला त्याच्या आयातीची गरज भासणार नाही असे पियुष गोयल यांनी सांगितले.

देशातील निर्यात बंदी हटणार नाही: (Export Ban In India)

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारकडून अद्याप गहू, साखर आणि तांदूळ यांची निर्यात बंदी हटवण्याचा कोणताही विचार नाही. देशांतर्गत या तिन्ही उत्पादनांना मागणी असल्यामुळे तसेच या उत्पादनांची पुरेशी उपलब्धता असल्यामुळे सरकारला देशांतर्गत गरजा पूर्ण करायच्या आहेत. भारताने मे 2022 रोजी गव्हाच्या निर्यात वर बंदी घातली होती, त्यानंतर जुलै 2023 मध्ये गैर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आणि पुढे ऑक्टोबर 2023 मध्ये साखरेच्या निर्यातीवर ही बंदी घालण्यात आली होती. देशांतर्गत वाढणारी महागाई कमी करण्यासाठी सरकारने हे सर्व निर्णय घेतले होते.

गेल्या वर्षात कमी पाऊस पडल्यामुळे गहू, तांदूळ आणि उसाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे व यामुळेच आता मैदा, तांदूळ आणि साखर या उत्पादनांच्या किमती वाढत आहेत. अशा परिस्थितीत देशांतर्गत असलेल्या बाजारपेठेत वस्तूंची उपलब्धता वाढावी म्हणूनच सरकारकडून त्वरित या सर्व वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. निर्यातीवर बंदी असतानाही भारताने आपले मित्र देश म्हणजेच इंडोनेशिया, सेनेगल आणि गांबिया यांना तांदूळ पुरवठा केला आहे. निर्यातीवरचे ही बंदी उठताच सदर उत्पादनांच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे गोयल यांनी सांगितले, मात्र सरकारच्या या निर्णयाचा विपरीत परिणाम बाजाराला भोगावा लागू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे(Export Ban In India). ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागू नये म्हणून सरकार वेळोवेळी काही वस्तूंच्या किमतींमध्ये फेरबदल करीत असते, कांद्याच्या किमती वाढल्यानंतर त्यांच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती, याशिवाय भारत आटा आणि भारत डाळही स्वस्त दरात बाजारात उपलब्ध करून देण्यात आली आहे.