FIRE Formula : आयुष्यभर आपण मेहनत घेतो, रात्रीचा दिवस करून कष्टाची कामं करतो. का? तर म्हातारपणी आपलं आयुष्य सुखी व समाधानी असावं म्हणून. वयाच्या साधारण 58 ते 60व्या वर्षी सरकारी किंवा खासगी कामातून आपण निवृत्त होतो, म्हणजेच Retirement घेतो. मात्र आजच्या तरुण पिढीची एवढा वेळ वाट पहायची तयारी नाही. वयाच्या चाळीशीतच त्यांना पैसा न कमावता सुखी आयुष्य जगायचे आहे.. परंतु यासाठी त्यांना काही आर्थिक नियोजन करावं लागेल. तसेच पैशाची बचत आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावं लागेल. यासाठी नेमकं काय करावं हेच आज आम्ही सांगणार आहोत.
तरुण पिढीची अशी आहे मानसिकता :
तुमच्या घरात तुम्ही आई वडिलांना अजूनपर्यंत काम करताना पाहिलं असेल, कारण मुळात त्यांची मानसिकताच तशी आहे. कष्ट जेवढे जास्ती तेवढेच फळही अधिक असा विचार ते करतात. मात्र तरुण पिढी याच्या एकदम विरुद्ध टोकाला आहे. त्यांना होईल तेवढ्या लवकर पैसे कमावण्याच्या तणावातून दूर जायचं आहे. मात्र सुखी आयुष्य जगण्यासाठी आर्थिक गुंतवणूक केली पाहिजे. भविष्यात येणारी संकटं काही सांगून येत नसतात, या सर्व संकटांना तोंड देण्यासाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम बनलं पाहिजे.
तरुणपिढी वापरते फायर फोर्मुला (FIRE Formula):
फायर फोर्मुला (FIRE Formula)म्हणजे फायनन्शिअल इनडपेन्डन्स, रिटायर अर्ली. म्हणजेच कामातून लवकर मुक्त व्हा आणि सोबतच आर्थिक दृष्ट्या सक्षम बना. तरुण पिढी आजकाल या फोर्मुलाचा वापर करते. हा बचत आणि गुंतवणुकीचा एक प्रभावी मार्ग आहे.
तरुण पिढीच्या दृष्टीने विचार केल्यास नोकरी करत असताना कमाई मधून 50 ते 70 टक्के पैश्यांची बचत करावी. मात्र असे करताना दररोजच्या खर्चासाठी तुमच्याजवळ केवळ 30% रक्कम राहते. हा फोर्मुला वापरात असताना आपली मिळकत सातत्याने वाढवत राहावी लागते. हा काळ महागाईचा आहे. त्यामुळे गुंतवणूक करत असताना दैनंदिन खर्चाची जबाबदारी व्यवस्थित सांभाळता आली पाहिजे.
मिळकत वाढण्यासाठी काय करावे?
निवृत्तीनंतरचे जीवन सुखी बनवायचे असेल तर मिळकत भरपूर असली पाहिजे. केवळ एका नोकरीच्या पगारात हे काही शक्य नाही. त्यामुळे वेळेचे नियोजन करत पार्ट टाइम जॉब करावा. बचत करण्यासाठी हातात भरपूर पैसा खेळला पाहिजे, त्यामुळे भरपूर पगार देणारी नोकरी बघा.
पैसे वाचवण्याचा सोपा उपाय म्हणजे खर्च कमी करणे. खर्च कमी करण्यासाठी योग्य नियोजन करा. कोणत्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या व गरजेच्या आहेत हे ओळखा व केवळ त्याच गोष्टींवर खर्च करा. कुठेही जायचे असल्यास सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा.
प्रभावी गुंतवणूकींवर भर द्या, कोणत्या गुंतवणुकीतून जास्ती परतावा मिळेल ह्याची चौकशी करा, गरज पडल्यास गुंतवणूकदरांचा सल्ला घ्या. चांगली पोलिसी, म्युच्युअल फंड ,बँक FD इत्यादीचा उपयोग करून घ्या.