परदेशातील व्यापार डॉलरऐवजी रुपयात होणार? पियुष गोयल यांनी दिले थेट संकेत

बिझिनेसनामा ऑनलाईन । जगात प्रत्येक देशाचे वेगेवेगळे चलन असून त्या अंतर्गत देशात व्यापार आणि आर्थिक व्यवहार होतात. या चलनाच्या माध्यमातू आंतरराष्ट्रीय व्यापारही शक्य आहे. आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर अमेरिकन डॉलरला आंतरराष्ट्रीय व्यापारात अधिक महत्त्व दिले जात होते परंतु आता भारतीय चलन असलेला रुपया थेट डॉलरला सुद्धा फाईट देऊ शकतो. व्यापारी लवकरच परदेशातून रुपयांमध्ये व्यवसाय करू शकतील असं मोठ विधान भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे.

आंतरराष्ट्रीय व्यापार रुपयात करण्यासाठी भारताकडून सातत्याने प्रयत्न केले जात असून यासाठी अनेक व्यापक पावले उचलण्यात येत असल्याचे पीयूष गोयल यांनी म्हंटल. सध्या अनेक देशांच्या बँका भारतीय बँकांमध्ये विशेष व्होस्ट्रो खाती उघडत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यूके, सिंगापूर आणि न्यूझीलंडसह 18 देशांतील संबंधित बँकांसह विशेष रुपी व्होस्ट्रो खाती (SRVA) उघडण्याच्या 60 विनंत्या मंजूर केल्या आहेत, अशावेळी अनेक देशांशी रुपयात व्यवहार होणे अपेक्षित आहे असं गोयल यांनी म्हंटल.

पियुष गोयल पुढे म्हणाले, जर अनेक देशांच्या बँकांशी आरबीआयची चर्चा पूर्ण झाली आणि करार झाला तर लवकरच त्या देशांसोबत आंतरराष्ट्रीय व्यापार रुपयात केला जाईल. यूके आणि कॅनडा यांसारख्या विकसित देशांसोबत मुक्त व्यापार करार (FTAs) साठी चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. संपूर्ण जगाला भारतासोबत सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार हवा आहे.