Francoise Bettencourt Meyers : जगात कितीतरी माणसं दिवस-रात्र मेहनत घेऊन आणि कष्ट करून शून्यातून दुनिया उभी करून दाखवतात. इथे यश कोणालाही सहजासहजी मिळालेलं नाही त्यासाठी प्रत्येक दिवशी थोडी फार मेहनत ही घ्यावीच लागते. आपण नेहमीच दुसऱ्याने कमावलेला पैसा किंवा त्याच्याजवळ असलेल्या सुखावर लक्ष केंद्रित करतो मात्र त्यामागे त्याच्याकडून घेतल्या गेलेल्या मेहनतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं. आपल्या भारत देशात अदानी, अंबानी यांसारखे अनेक श्रीमंत उद्योजक वावरतात, तसेच जगाच्या पाठीवर एलोन मस्क यांच्यासारखे जगप्रसिद्ध उद्योजक दररोज काही ना काही अनपेक्षित निर्णय घेत प्रत्येकाच्या मनात एक आदराचे स्थान निर्माण करतात, त्यांची नेहमीच वाहवा केली जाते. कर्तृत्ववान पुरुषांच्या कामगिरीचे पोवाडे आपण नेहमीच गातो, मात्र तुम्हाला माहिती आहे का या जगातील सर्वात श्रीमंत महिला कोण आहे? कारण साधारणपणे महिला म्हटलं की त्यांच्या कर्तृत्वावर, कार्यक्षमतेवर आणि ताकदीवर नेहमीच प्रश्नचिन्ह उभं केलं जातं. मात्र जगभरात अशा अनेक महिला आहेत ज्या अहोरात्र मेहनत करत ही संकल्पना फोल ठरवण्याचे काम करतात.
कोण आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला? (Francoise Bettencourt Meyers)
तुमच्या वाचनात कधी फ्रान्सवा बेटनकोर्ट मायर्स (Francoise Bettencourt Meyers) हे नाव आलं आहे का? कारण जगभरात सध्या सर्वात श्रीमंत म्हणून ओळखली जाणारी हीच ती महिला आहे. फ्रान्स मधल्या या महिलेने श्रीमंत महिलेचा दर्जा मिळवत स्वतःचे नाव अनेक वर्षांसाठी जगाच्या इतिहासात रुजू केले आहे. सध्या त्यांच्या संपत्तीने शंभर अरब डॉलरचा आकडा पार केला आहे. आपल्या देशातील कुठलाही श्रीमंत माणूस या महिलेपुढे टिकाव धरू शकणार नाही, तसेच जगभरातील महिला वर्गामध्ये आत्तापर्यंत एवढी कमाई कोणीही करून दाखवलेली नाही.
जगातील श्रीमंत माणसांच्या यादीत या महिलेने बारावे स्थान प्राप्त केले आहे. या स्वतः जगभरातील सर्वात प्रसिद्ध कॉस्मेटिक कंपनी म्हणजेच लॉरियलच्या उत्तराधिकारी आहेत. फ्रान्सवा बेटनकोर्ट मायर्स (Francoise Bettencourt Meyers) यांच्याजवळ लॉरियल्स कंपनीमधील 34 टक्के हिस्सेदारी आहे. 1909 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या कंपनीला कोरोनाच्या काळात थोडीशी उतरती कळा लागली होती. कोरोनाच्या महामारी दरम्यान सामान्य वस्तू देखील बाजारात मागणीचा तुटवडा सहन करीत होत्या, आणि अशा परिस्थितीत लॉरियल सारख्या महाग वस्तूंची मागणी कमी होणं साहजिकच होतं. मात्र आत्ताच्या घडीला लॉरियल ही कंपनी पुन्हा एकदा जोमाने व्यवसाय करत असून वर्ष 2023 मध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये 35 टक्क्यांची वाढ झाली आहे.
‘त्या’ महिलेने भारतातील मुकेश अंबानींना टाकले मागे:
भारत देशात तसेच आशिया खंडात मुकेश अंबानी हे सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून ओळखले जातात. मात्र लॉरियलच्या मालकीण बाईंची एकूण संपत्ती मुकेश अंबानी यांच्यापेक्षा कैक पटीने अधिक आहे. असं म्हणतात की फ्रान्सवा बेटनकोर्ट मायर्स (Francoise Bettencourt Meyers) या 70 वर्षांच्या असल्या तरी सुद्धा अजूनही त्या त्यांच्या श्रीमंत आणि दर्जेदार राहणीमानासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आई, म्हणजेच एलियन युजीन शूलर या देखील एका काळी ही जगभरातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून ओळखल्या जात होत्या. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या आई वर्ष 2017 पर्यंत सर्वात जगभरात श्रीमंत महिला म्हणून ओळखली जात होती.