Gautam Adani Net Worth : गेल्या वर्षभरापासून गौतम अदानी हे नाव प्रत्येक वर्तमानपत्राच्या ठळक बातम्यांमध्ये पाहायला मिळतेय. अदानी आणि हिंडनबर्ग यांच्यात चालू असलेल्या वादामुळे अदानी नेहमीच चर्चेचा विषय बनलेले असायचे. मागच्या एकूण वर्षात गौतम अदानी तसेच त्यांच्या कंपनीने भल्या मोठ्या नुकसानीचा सामना केला आहे. त्यांच्यावर फसवणूक आणि हेराफेरीचा आरोप दाखल झाल्यानंतर अनेक संस्थांकडून याची चौकशी सुरू झाली होती, भारतात सर्वोच्च न्यायालयाने ही जबाबदारी सेबीला सोपवलेली असून आता केवळ दोन घटकांची तपासणी झाल्यानंतर सर्व प्रकरणाचा एकंदरीत खुलासा होईल. या एका निर्णयामुळे गौतम अदानी यांची परिस्थिती हळूहळू बदलत आहे. आणि मागच्या वर्षभरापासून संकटांचा सामना करीत असलेला अदानी समूह पुन्हा एकदा व्यावसायिक दृष्ट्या वृद्धिंगत होताना दिसतोय. अदानी समूहाच्या तेजीचा जोर एवढ्या जबरदस्त आहे की आता त्यांनी भारतातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांना मागे टाकत भारत देश आणि आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या पदावर स्वतःचं नाव लिहिलंय.
अदानी बनलेत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती: (Gautam Adani Net worth)
गेल्या वर्षभरात कठीण परिस्थितीचा सामना करत असलेले गौतम अदानी आजच्या घडीला आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. हिंडर्नबर्गच्या अहवालामुळे त्यांच्या खाजगी मालमत्ते देखील बरीच घट झाली होती. मात्र आता अदानी समूहासाठी दिवस पालटले आहेत, यांचा विजय रथ थांबत नसून त्यांनी जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत बारावे स्थान पटकावले आहे. गेल्या 24 तासात अदानी यांच्या संपत्तीत 7.6 अब्ज डॉलर्सची वाढ नोंदवण्यात आली. ब्लुमबर्ग बिलीयोनेअर इंडेक्स नुसार अदानी यांच्या संपत्तीत आतापर्यंत 13.3 अब्ज डॉलर्सची वाढ नोंदवण्यात आली आहे.
अदानींनी केवळ एका दिवसात कमावले 4 अब्ज डॉलर्स:
काल सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर झाल्यानंतर अदानींच्या विविध कंपन्यांमध्ये तेजी आलेली पाहायला मिळाली. कंपनीचे शेअर्स धुवाधार कामगिरी करत वेगाने वाढत होते. यामध्ये अदानी एंटरप्राइजेस, अदानी पोर्ट्स, अदानी एनर्जी सोल्युशन्स इत्यादी कंपन्यांचा समावेश होता. या सर्व कंपन्यांच्या शेअर्सनी केलेली दमदार कामगिरी पाहता गौतम अदानी यांची नेटवर्थ (Gautam Adani Net Worth ) गेल्या 24 तासात वाढली असून त्यांच्या संपत्तीत 33,000 कोटी रुपयांची वाढ झाली, तसेच अदानी समूहाचे मार्केट कॅपिटललायझेशन 15 लाख कोटी रुपयांच्या जवळ पोहोचले आहे.
वर्ष 2023 अदानी समूहासाठी पूर्णपणे खराबीचं असल्यामुळे त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले. मात्र या नवीन वर्षाची सुरुवात अदानी समूहासाठी खूपच दमदार ठरली. एवढे दिवस संपूर्ण आशिया खंडात आपला दबदबा कायम ठेवलेल्या मुकेश अंबानी यांना अदानींच्या भरधाव वेगाचा फटका बसला आहे. वर्षाच्या पहिल्या महिन्यातच एवढी दमदार कामगिरी केल्यानंतर संपूर्ण वर्षात अदानी समूह यशाची नेमकी किती शिखरं गाठतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.