बिझनेसनामा । केंद्र सरकारकडून देशातील स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू करण्यात आली आहे. एप्रिल 2015 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेच्या माध्यमातून लघुउद्योगांना कर्ज दिले जाते. PMMY मधील मुद्राचा अर्थ मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी असा आहे. देशात रोजगार निर्मिती हा या योजनेमागील उद्देश आहे. Business Loan
हे लक्षात घ्या कि, पीएम मुद्रा योजनेअंतर्गत एकूण तीन प्रकारची कर्जे दिली जातात. त्यातील पहिला शिशु, दुसरा किशोर आणि तिसरा तरुण असे आहे. यातील शिशूमध्ये अर्जदाराला 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवता येते. तसेच किशोरमध्ये अर्जदाराला 50,001 ते 5,00,000 पर्यंत तर तरुणमध्ये अर्जदाराला 5,00,001 ते 10,00,000 पर्यंतचे कर्ज दिले जाते. या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाची मुदत 5 वर्षे असेल.
या योजनेचे फायदे जाणून घ्या
पीएम मुद्रा योजनेअंतर्गत बँक किंवा इतर कोणत्याही संस्थेकडून कर्ज घेण्यासाठी आपल्याला कोणतीही सिक्योरिटी जमा करण्याची गरज नाही. यासाठी सरकार कडून कर्जाची हमी दिली जाते. तसेच कर्जासाथीचे प्रक्रिया शुल्क देखील खूपच कमी आहे. यासोबतच महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याक लोकांना या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यावर व्याजदरात सूट दिली जाते.
या गोष्टींसाठी घेता येते कर्ज
या योजनेद्वारे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाते. यामध्ये अर्जदार व्यावसायिक वाहने – ट्रॅक्टर, ऑटो रिक्षा, टॅक्सी ट्रॉली, ई-रिक्षा; सर्व्हिस- जिम, सलून, टेलरिंग शॉप, मेडिकल शॉप, ड्राय क्लीनिंग, फोटोकॉपी; खाद्यपदार्थ- लोणचे, पापड, आईस्क्रीम, बिस्किटे, मिठाई; कृषी उपकरणे, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, मधमाशीपालन आणि पशुपालन इत्यादींसाठीही या योजनेंतर्गत कर्ज दिले जाते.
महिलांनाही होणार मोठा फायदा
सरकारच्या या प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत महिला उद्योजकांनाही प्रोत्साहन दिले जाते. महिला उद्योजकांसाठीच्या योजनेच्या अटी आणि नियम इतरांसाठी सारख्याच आहेत. यामध्ये सर्वात मोठा फायदा म्हणजे महिलांना कमी व्याजदरात कर्ज दिले जाईल.