Goa State Entry Toll : सध्या आपण वर्ष 2023 च्या शेवटच्या टप्प्यात वावरत आहोत, आणि आठवड्यानंतर आपण नवीन वर्षात पदार्पण करू. नवीन वर्ष म्हटलं की प्रत्येकाच्या मनात गोव्याला जाण्याची इच्छा निर्माण होते. सहाजिकपणे आत्तापर्यंत अनेक लोकांनी गोव्याला जाण्याच्या तिकिटांवर शिक्का मोर्तब केलेला असेल, तुम्ही देखील जर का गोव्याला जाण्याच्या विचारात असाल तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलेल्या नवीन माहितीबद्दल नक्कीच जाणून घ्या… कारण आता इथून पुढे गोव्याला जाण्यासाठी तुम्हाला टॅक्स भरावा लागेल.
काय म्हणाले नितीन गडकरी?
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांच्या बाबतीत एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. गोवा राज्यात जाणाऱ्या पर्यटकांना आता वाहनांवर प्रवेश टोल भरावा लागणार असून, हे टोल नाके गोव्याच्या सीमेत पदार्पण करताना पत्रादेवी व कोळे या ठिकाणी बसवण्यात येणार आहेत (Goa State Entry Toll). एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करीत असताना लागू होणाऱ्या नियमांच्या आधारे हा टोल भरणे प्रत्येक प्रवेशासाठी अनिवार्य असते. गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर सदर प्रस्ताव मांडला होता ज्यावर केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद नोंदवला व त्यामुळेच आता गोव्याच्या एन्ट्री पॉईंटवर सरकार टोलाची रक्कम आकारेल.
कधीपासून सुरु होणार टोल- Goa State Entry Toll
हे टोल नाके नेमके कधीपासून बसवण्यात येतील याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र केंद्रीय मंत्र्यांनी शनिवारी महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक राज्यातील रस्ते महामार्गाच्या प्रकल्पाबद्दल झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला सकारात्मक पाठिंबा दिला होता. ही बैठक गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के सिंग, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत गोव्यात पार पडली होती.
शनिवारी झालेल्या बैठकीत मुंबई-गोवा महामार्ग याबद्दल चर्चा करण्यात आली. दरम्यान गोवा राज्यात सुरू झालेल्या मोपा या नवीन विमानतळाला जोडला जाणारा महामार्ग फेब्रुवारीच्या अखेरीपर्यंत पूर्ण करण्यात यावा याबद्दल सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत. तसेच गोव्याच्या इतर ठिकाणी अडकलेले महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे असेही केंद्रीय मंत्र्यांनी सुचित केले आहे.
बैठकीच्या दरम्यान घेण्यात आलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये गोव्यात येणाऱ्या पर्यटकांवर लागू होणारा टोल हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरला (Goa State Entry Toll). आता महाराष्ट्रातून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना पत्रादेवी येथे तर कर्नाटक मधून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना कोळे या ठिकाणी टोल नाक्यांवर एक विशेष रक्कम भरावी लागणार आहे. चर्चेच्या दरम्यान गोवा राज्यातील शहरांमध्ये टोल नाके उभारण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्र्यांनी असहमती दर्शवली असून एंट्रीला टोल नाके उभारण्यास तत्वतः मान्यता दिली आहे.