Gold Rate : 2024 मध्ये सोन्याच्या किंमती वाढणार; 70 हजारांच्यावर आकडा जाणार

Gold Rate : वर्ष 2023 हे भारतीय बाजारासाठी खरोखर खास होतं. कारण या वर्षात आपल्या अर्थव्यवस्थेने जगभरात बाजी मारली होती, आणि येणाऱ्या भविष्यासाठी दमदार कामगिरी करण्याचा पाय रोवला होता. केवळ अर्थव्यवस्थेसाठीच नाही तर देशातील गुंतवणूकदारांसाठी सुद्धा हे वर्ष उपयोगी ठरलं आहे. कितीतरी कंपन्यांनी IPO जारी करत गुंतवणूकदारांना खुश केलं होतं, तर अनेकांनी बाजारात उत्तम कामगिरी बजावत असलेल्या शेअर्सची खरेदी केली होती. गेल्या वर्षाचा एकूण आढावा घेतला तर हे वर्ष भारतीय बाजारी परिस्थती सुधारणारं ठरलं असं म्हणावं लागेल. मात्र नवीन वर्ष सुद्धा काही 2023 पेक्षा मागे नाही, कारण येतानाच ते स्वतःसोबत गुंतवणूक करण्याची खास संधी घेऊन आलं आहे. जुनं वर्ष एवढं उपयोगी ठरल्यानंतर नवीन वर्षात सर्वात आधी उपलब्ध होणारी गुंतवणुकीची हि संधी आहे तरी काय हे आज सविस्तर जाणून घेऊया..

यंदाच्या वर्षी करा सोन्याची गुंतवणूक: (Gold Rate)

हे नवीन वर्ष सोन्याची गुंतवणूक करण्यासाठी योग्य ठरू शकतं. वर्ष 2023 मध्ये 64 हजार रुपयांवर व्यवहार सुरु असलेल्या सोन्याच्या किमती या नवीन वर्षात 70 हजार रुपये प्रति 10 ग्राम असा आकडा गाठू शकतात. तज्ञांच्या मते रुपयांमध्ये असलेली स्थिरता, भू-राजकीय अनिश्चितता आणि जागतिक मंदीमुळे सोन्याचे भाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. रशिया आणि युक्रेन तसेच हमास आणि इस्राएल यांच्यात झालेल्या भीषण युद्धाच्या परिणामी मध्यपूर्वे (Middle East) या भागामध्ये तणाव वाढला आणि म्हणूनच डिसेंबर महिन्यामध्ये सोन्याच्या किमतींमध्ये वाढ झाली होती. आता तज्ञांच्या मते नवीन वर्षात देखील सोन्याच्या किमती (Gold Rate) अधिक प्रमाणात वाढत जातील.

नवीन वर्षात सोनं गाठणार 70 हजारचा आकडा:

डिसेंबर महिन्यात सोनं 64 हजार रुपये प्रति 10 ग्राम किमतींचा आकडा गाठून 2,140 डॉलर्स प्रति औसच्या सर्वोच्य पातळीवर जाऊन पोहोचले होते. तसेच येणाऱ्या वर्षात ते 2,400 डॉलर्स पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे (Gold Rate). भारतीय बाजारात जर का रुपया स्थिर राहिला तर नवीन वर्षांत सोन्याचा आकडा 70 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. सध्या देशात निवडणुकांचे वातावरण सुरु आहे, ज्याच्या परिणामी विदेशी संस्थागत गुंतवणूकदार विक्रीसाठी बाजारात उतरू शकतात. यामुळे रुपया कमकुवत होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच सोन्याच्या दारांत आणखीन वाढ होऊ शकते.

तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याने किरकोळ दागिन्यांची खरेदी कमी झाली आहे. बाजार नाण्यांची मागणी वाढत आहे आणि अमेरिकन डॉलरच्या मजबूतीमुळे सोन्याच्या किमतीतही वाढ झाली आहे. शेवटी यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 22 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर वाढ केली असल्याने सोन्याचे दरही वाढले आहेत.