बिझिनेसनामा ऑनलाइन | गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटमध्ये गेल्या काही दिवसांत अनेक कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. एकीकडे ही कपात होत असताना दुसरीकडे कंपनीचे CEO सुंदर पिचाई यांनी मात्र मोठी कमाई केली आहे. भारतीय वंशाचे असलेले सुंदर पिचाई यांना 2022 मध्ये सुमारे 226 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 18.54 अब्ज रुपये पगार मिळाला आहे. विशेष म्हणजे ही रक्कम गुगलच्या सामान्य कर्मचाऱ्याच्या पगारापेक्षा तब्बल 800 पट जास्त आहे .
सुंदर पिचाई यांचे कार्य आणि अनेक नवीन प्रोडक्ट्सच्या यशस्वी लॉन्चिंगमुळे गुगलच्या मूळ कंपनी असलेलया अल्फाबेटने हा जास्तीचा पगार दिला आहे. टेक जायंटने यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (SEC) कडे दाखल केलेल्या माहितीनुसार, पिचाईच्या कमाईमध्ये सुमारे $218 दशलक्ष किमतीच्या स्टॉक अवार्डचा समावेश आहे. पिचाई यांच्या नेतृत्वाखाली, Google ने त्यांच्या प्रमुख जाहिराती आणि YouTube व्यवसायातून चांगला नफा कमवला. यादरम्यान, कंपनीने मशीन लर्निंग, हार्डवेअर आणि क्लाउड कॉम्प्युटिंगमध्येही गुंतवणूक केली आहे.
दरम्यान, सध्या अनेक कंपन्या कामगारांची कपात करत आहे. Google ने सुद्धा या वर्षी जानेवारीमध्ये,आपल्या एकूण कर्मचार्यांपैकी 6% म्हणजेच सुमारे 12,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. त्यानंतर मार्च महिन्याच्या सुरुवातीला 200 कर्मचाऱ्यांना कंपनी कडून नारळ देण्यात आला. त्यामुळे या महिन्याच्या सुरुवातीला शेकडो कर्मचार्यांनी कंपनीच्या लंडन कार्यालयाबाहेर कामावरून कमी केल्याबद्दल निदर्शने सुद्धा केली होती.