Google Layoffs : जागतिक स्तरावर सध्या आपण तांत्रिकदृष्ट्या अधिकाधिक सक्षम बनत आहोत. आत्तापर्यंत माणसाने आपल्या बुद्धीच्या जोरावर वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन केलं, आणि सध्या चर्चेत असलेल्या AI टेक्नॉलॉजीमुळे जगभरात एक वेगळीच क्रांती घडून येत आहे. AI च्या मदतीमुळे माणसांना वेगवेगळ्या कामात मदत होईल व परिणामी त्यांचा वेळही वाचेल म्हणून आपण सर्वच क्षुह होतो. “AI च्या मदतीने माणसाचं जीवन अधिकाधिक सोपं करणं हेच आमचं ध्येय आहे” असं मत नवीन टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी व्यक्त केलं होतं . मात्र काही लोकांमध्ये यामुळे विविध क्षेत्रांमध्ये नोकरदारांना कायमचं घरी बसावं लागू शकतं अशी भीती निर्माण झाली होती आणि आत्ता जगातील सर्वात मोठी सर्च इंजिन कंपनी म्हणजेच गुगल हिने AI टेक्नॉलॉजिचा वापर सुरू केल्यामुळे जवळपास तीस हजार कर्मचाऱ्यांना कंपनीला कायमचा रामराम ठोकावा लागू शकतो अशी बातमी समोर आली आहे.
गुगल कर्मचाऱ्यांना बाहेर काढणार का?(Google Layoffs)
माणसाला मदत करण्यासाठी बनवली गेलेली AI टेक्नॉलॉजी माणसाच्या विरुद्धच व्यवहार करीत आहे का? अशी शंका सध्या व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी गुगल या सर्च इंजिन कंपनीकडून Gemini आणि Google Bard अशा दोन AI टेक्नॉलॉजी बाजारात आणल्या गेल्या. आणि सध्या गुगल कंपनीमध्ये AI चा विस्तार करण्याचा विचार करत असल्यामुळे कंपनी तीस हजार कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवू शकते. कंपनीच्या जाहिरात विभागातर्फे लवकरच एक बैठक घेण्यात येणार आहे, अद्याप त्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नसला तरीही काही काळात जाहिरात क्षेत्रावर AI चा परिणाम होऊन कंपनी कर्मचाऱ्यांमध्ये कपात करू शकते.
माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार गुगलने आपल्या कस्टमर सर्विस विभागामध्ये AI चा वापर सुरू केल्याने याचा विपरीत परिणाम कर्मचाऱ्यांवर दिसून येणार आहे. गेल्यावर्षी गुगलने 12000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकलं होतं. आणि आता पुन्हा एकदा गुगल AI तंत्रज्ञानाचा वापर करून कंपनीच्या सुविधांमध्ये काही बदल करण्याच्या मार्गावर आहे (Google Layoffs). गुगलने नवीन AI सक्षम जाहिराती तयार केल्या आहेत, ज्या गुगल जाहिरातींमध्ये एक बहुभाषी बोलण्याचा अनुभव प्रदान करतात. हे तंत्र शोधकार्य जलद आणि जाहिरात सोपी करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. गुगलने दिलेल्या माहितीनुसार कंपनीचे नवीन AI तंत्र तुमची वेबसाइट स्कॅन करून योग्य गोष्टी शोधू शकते आणि वापरकर्त्यांसमोर ठेवू शकते, यामुळे धावपळीच्या काळात वेळ वाचवायला मदत मिळते.
AI मुळे ‘या’ कंपन्यांनी कर्मचारी हटवले:
AI चा अवलंब केल्याने जर का गुगल या सुप्रसिद्ध कंपनीने खरोखरच कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला तर ही जगभरातील सर्वात मोठी कपात म्हणावी लागेल (Google Layoffs). पण लक्षात घ्या की AIच्या वापरामुळे केवळ गुगलनेच नाही तर यापूर्वी अमेझॉन, मेटा, ट्विटर यांसारख्या बलाढ्य कंपन्यांनी देखील कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची घोषणा केली होती. जगभरातील हि बदलती परिस्थती पाहता टेक्नॉलॉजि अधिक प्रगत होत असली तरीही, यामुळे माणसाला फायद्यापेक्षा तोटाच सहन करावा लागतोय कि काय? असा प्रश्न साध्या निर्माण झालाय.