Green FD: गुंतवणुकीचा अनोखा प्रकार करेल पर्यावरणाची मदत; पण हा प्रकार आहे तरी कोणता?

Green FD: भारत वेगाने विकसित होत आहे आणि यात हरित ऊर्जेचा वापर वाढवणे हे एक महत्त्वाचे पाऊल म्हणावे लागेल. बँकांकडून हरित प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी, Green FD योजना सुरू करण्यात आली आहे. Green FD ही एक मुदत ठेव योजना आहे जी बँकांमध्ये उपलब्ध असते. या योजनेद्वारे जमा केलेले पैसे हे हरित ऊर्जा प्रकल्पांना कर्ज देण्यासाठी वापरले जातात, म्हणूनच Green FD मध्ये गुंतवणूक करून तुम्ही पर्यावरणपूरक प्रकल्पांना समर्थन देऊ शकता आणि हवामान बदलाशी लढण्यास मदत करू शकता.

Green FD म्हणजे काय?

आजकाल गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी पारंपारिक मुदत ठेवी (FD) हा लोकप्रिय पर्याय ठरतो. पण, भविष्यात आपण वापरत असलेल्या साधनांमध्ये बदल होत आहेत. विविध उपकरणांमध्ये हरित ऊर्जेचा वापर वाढत आहे. या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक बँका Green FD योजना राबवतात. मगाशी म्हटल्याप्रमाणे Green FD मध्ये गुंतवलेली रक्कम हरित ऊर्जा प्रकल्पांसाठी वापरली जाते आणि यात गुंतवणूक करणाऱ्यांना वित्तीय सुरक्षा आणि नैतिक गुंतवणुकीचा लाभ मिळतो. थोडक्यात, पर्यावरणपूरक विकास आणि उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या प्रकल्पांसाठी या ठेवींचा वापर केला जातो.

Green FD चे आकडे कसे आहेत?

SBI ने नुकतीच “SBI ग्रीन रुपया मुदत ठेव योजना” नावाची नवीन FD योजना सुरू केली आहे. या योजनेत तुम्ही किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि त्यावर कोणतीही कमाल मर्यादा नाही. यामध्ये तीन प्रकारच्या मुदतीची FD दिली जाते. ज्यात 1111 दिवस आणि 1777 दिवसांच्या FD मध्ये सामान्य गुंतवणूकदारांना 6.65 टक्के आणि ज्येष्ठ गुंतवणूकदारांना 7.15 टक्के व्याज दिले जाते. 2222 दिवसांच्या FD मध्ये गुंतवणूकदारांना 6.40 टक्के तर ज्येष्ठ गुंतवणूकदारांना 7.40 टक्के व्याज दिले जाते.

दुसऱ्या बाजूला सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून ग्रीन टाईम डिपॉझिट (Green Time Deposit) ऑफर केले जात आहे. इथे बँक 1111 दिवसांच्या ग्रीन एफडीवर 5.90 टक्के, 2222 दिवसांच्या Green FD वर 6.00 टक्के आणि 3333 दिवसांच्या Green FDवर 6.10 टक्के व्याज देत आहे.