Groww Success Story : शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली सर्वात मोठी ब्रोकिंग कंपनी; Groww ची संपूर्ण कहाणी माहिती आहे का?

Groww Success Story : आयुष्यात प्रत्येकालाच यशस्वी होण्याची इच्छा असते, मात्र त्यासाठी लागणारे कष्ट आणि मेहनत घेण्यात आपण अपुरे पडतो. तुम्ही आतापर्यंत अनेक यशस्वी माणसांचे प्रवास पहिले असतीलच, ती सर्व माणसं जरी वेगवेगळी असली, त्यांची परिस्थिती भिन्न असली तरीही प्रत्येकाच्या गोष्टीत कष्ट हा घटक मात्र कायम तोच राहिला आहे. कष्टाची भूमिका कायम तीच राहिली आहे. केवळ कष्टच केले म्हणजे जीवन सफल होईल का? तर नाही!! कष्टांना नेहमीच जोखीम पत्करण्याची सोबत असली पाहिजे. परिस्थती कोणावर सांगून घाला घालत नाही. अश्या नकळत येणाऱ्या वाईट प्रसंगांमध्ये टिकाव धरण्यासाठी कधीतरी जोखीम हि पत्करावीच लागते आणि असा खंबीर, जिद्दी आणि मेहनती माणूसच आयुष्यात नाव कमावू शकतो. तुम्ही शेअर बाजाराबद्दल जाणून असाल तर Groww , या ब्रोकिंग ऍप बद्दल नक्कीच माहिती मिळवली असेल. आज जाणून घेऊया Groww ची निर्मिती करण्याऱ्या ललित केश्रे यांची जीवन कहाणी..

शेतकऱ्याच्या मुलाने उभी केली कंपनी:

ललित केश्रे हे काही जन्माला येतानाच तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेले नाहीत. त्यांचा जन्म मध्य प्रदेश राज्यांत खारगोन जिल्ह्यातील लेपा गावात एका शेतकरी कुटुंबात झाला होता. शेतकरी कुटुंब असून देखील त्यांच्या वडिलांना शिक्षणाचे महत्व माहिती होते आणि त्यांनी नेहमीच ललित यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. ललित केश्रे यांनी सुरवातीचे शिक्षण त्यांच्या गावातूनच पूर्ण केले. मात्र उच्च शिक्षण मिळवण्यासाठी ते गावाबाहेर पडले आणि मुंबई या मायानगरीतून IIT ची पदवी मिळवली. इतर उच्च शिक्षित मंडळींप्रमाणेच ललित यांनी IIT मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टमध्ये काम केले. नावाजलेल्या फ्लिपकार्टमध्ये ते प्रोडक्ट मॅनेजर म्हणून जबाबदारी सांभाळत होते. मात्र व्यवसाय सुरु करण्याचा विचार मनात बाळगून त्यांनी वर्ष 2016 लाखो रुपये मिळत असलेल्या कंपनीवर कायमचं पाणी सोडलं आणि तीन मित्रांसोबत ‘ग्रो’ (Groww Success Story)या ब्रोकिंग ऍपची स्थापना केली.

अशी झाली ‘ग्रो’ ची सुरुवात: (Groww Success Story)

फ्लिपकार्ट मधल्या मोठ्या पगाराच्या कामाला कायमचा राम-राम ठोकल्यानंतर ललित केश्रे यांनी मित्रांच्या सोबत ब्रोकिंग ऍपची सुरुवात केली. केवळ सात वर्षांतच त्यांच्या कंपनीने भली मोठी प्रगती करून दाखवली आहे. हि कंपनी गुंतवणूकदारांना शेअर, म्युच्युअल फंड, एक्सचेंज-ट्रेडेट फंड, IPO, अमेरिकी शेअर्स, फ्युचर्स अँड ऑप्शन्स, फिक्स डिपॉजिट आणि सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करवून देते. आज शेअर बाजाराची माहिती ठेवणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडून ग्रो या ऍपचे नाव ऐकायला मिळते. जगभरातील मोठ मोठ्या गुंतवणूकदारांनी देखील गुंतवणूक करण्यासाठी ग्रो ची निवड केली आहे (Groww Success Story). या मध्ये मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला, सिकोइया कॅपिटल आणि टायगर ग्लोबल सारख्या दिग्गजांचा समावेश होतो.