GST Fraud Cases: GST म्हणजे गुड्स अँड सर्विस टॅक्स (Goods and Service Tax). हा एक प्रकारचा अप्रत्यक्ष कर आहे जो देशातील विविध वस्तू आणि सेवांच्या वापरावर लावला जातो. ग्राहक जीएसटी (GST)च्या माध्यमातून सरकारला अप्रत्यक्षपणे काही रक्कम कर म्हणून देत असतात. केंद्र सरकारकडून गेल्या सहा वर्षांपूर्वी GSTकर देशात लागू करण्यात आला होता, आणि या जीएसटीमुळेच देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यातही बऱ्यापैकी मदत मिळाली होती. मात्र सध्या देशात जीएसटी कर चोरीचे मामले अधिकाधिक वेगाने वाढत आहेत. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार जीएसटी ऑथॉरिटीज(GST Authorities) कडून वर्ष 2023 च्या मे महिन्यात चालवल्या गेलेल्या तपासातून तब्बल 44,015 कोटी रुपयांची जीएसटी चोरी पकडली गेली आहे. शिवाय काही बनावटी कंपन्यांचा देखील कायमचा पर्दाफाश झाला आहे. या सर्व कंपन्या गेल्या अनेक दिवसांपासून बेकायदेशीर प्रकारे कार्यरत असून सरकारच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम करीत होत्या. देशभरातून अशा प्रकारच्या एकूण 29,273 बनावट कंपन्या जगासमोर समोर आल्या आहेत, तसेच गेल्या वर्षभरात अश्या 121 कर चोरी प्रकरणांच्या बाबतीत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.
काय आहे GST चोरी अभियानाचा निकाल?(GST Fraud Cases)
गेल्यावर्षी मे महिन्यात सरकारकडून देशभरातील जीएसटी प्रकरणांचे घोटाळे उघडकीस आणण्यासाठी खास मोहिमेची आखणी करण्यात आली होती आणि ही मोहीम सर्व प्रकारे यशस्वी झाली आहे. या तपास मोहिमेमधून तब्बल 29,273 बेकायदेशीर कंपन्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी या कंपन्यांकडून 44,015 कोटी रुपयांची मोठी वसुली केली असून, जीएसटी चोरी प्रकरणात आत्तापर्यंत 121 गुन्हेगारांना सरकारी अधिकाऱ्यांनी कोठडीचा मार्ग दाखवलेला आहे.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ तसेच CBIC बोर्ड देशभरात अस्तित्वात नसलेल्या किंवा बनावट नोंदणी करणाऱ्यांवर कारवाई करत आहे. जीएसटीमधील फसवणुकीला आळा घालण्यासाठी याचा वापर केला जातोय. खरं तर, काही बनावटी कंपन्या मूलभूत वस्तू आणि सेवांशिवाय खोट्या पावत्या देऊन कर चुकवताना आढळल्या आहेत. गेल्या डिसेंबर महिन्यापर्यंत एकूण 4153 खोट्या कंपन्यांकडून 12,036 कोटी रुपयांची चोरी पकडण्यात आली (GST Fraud Cases). यापैकी 2358 बनावटी कंपन्या केंद्रीय जीएसटी अधिकार्यांनी शोधून काढल्या, ज्यामुळे 1317 कोटी रुपयांच्या महसुलाची बचत झाली. या संपूर्ण प्रकरणात 41 जणांना ताब्यात घेण्यात आले असून, यांपैकी 31 जणांना केंद्रीय जीएसटी अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.
जीएसटी चोरी प्रकरणात महाराष्ट्राचा पहिला नंबर:
देशभरात चालवलेल्या या अभियानाद्वारे अनेक जीएसटी घोटाळे समोर आले होते. मात्र यात महाराष्ट्र राज्याचा पहिला नंबर लागल्याने ही बाब आपल्यासाठी खेददायक ठरली आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक जीएसटी कराची चोरी झाल्याची बातमी उघडकीस आली असून, राज्यात एकूण 926 बनावटी कंपन्यांनी 2,201 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे (GST Fraud Cases). दिल्लीत देखील GST संबंधित घोटाळ्यांचे प्रकरण वाढत असून आत्तापर्यंत एकूण 3028 कोटी रुपयांची चोरी पकडण्यात आली आहे.