GST Notice To LIC : कालच देशभरातील सुप्रसिद्ध विमा कंपनी म्हणजे LIC ला GST कढून नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटीस च्या आधारे विमा कंपनीला एकूण 806 कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे, या दंडामध्ये 365.2 कोटी रुपये जीएसटी, 404.7 कोटी रुपये दंड आणि 36.6 कोटी रुपयांचा व्याज भरावा लागणार आहे. एलआयसी कंपनीने या नोटीस विरुद्ध लवकरच अपील करण्याचा निर्णय जाहीर केला असला तरीही, गुंतवणुकीच्या बाजारात ही सर्वात मोठी खबर असल्यामुळे याचा थेट परिणाम आज LIC च्या शेअर्सवर होताना दिसला. एलआयसी बद्दलची ही बातमी बाजारात पसरायला सुरुवात होताच कंपनीच्या शेअर्समध्ये दोन टक्क्यांची घसरण झालेली पाहायला मिळाली. कंपनी जरी या विरोधात अपील करणार असली तरीही या बातमीचा कंपनीच्या शेअर्सवर झालेला त्वरित परिणाम हा नजरेआड करून चालणार नाही, कारण कंपनीच्या शेअर्सवर नजर टाकायचे झाल्यास आज सकाळी नऊ वाजून 15 मिनिटांनी 853.80 रुपयांवर कंपनीचा बाजार खुला झाला, मात्र जारी केलेल्या नोटीसच्या परिणामी केवळ एका तासातच कंपनीचे शेअर्स घसरून थेट 809 रुपयांवर येऊन पोहोचले होते.
LIC ला का मिळाली होती GST ची नोटीस? (GST Notice To LIC)
LIC ही विमा कंपनी देशभरातील ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यास यशस्वी ठरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारतात आपले नाव कमावत असलेल्या LIC कंपनीला अचानक जीएसटी नोटीस मिळाल्यामुळे ग्राहकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. आणि ही रक्कम साधीसुधी नसून तब्बल 806 कोटी रुपयांची असल्याने कंपनीकडून नेमकी काय चूक झाली असे प्रश्नचिन्ह सर्वांच्या मनात उपस्थित झाले आहे (GST Notice To LIC). एलआयसी कंपनीला मुंबईमधील डेप्युटी कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स या विभागाकडून सदर नोटीस मिळाली असून कंपनीने इनपुट टॅक्स क्रेडिट नियमांचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. एलआयसी कंपनी मात्र या आरोपांशी सहमत नसून त्यांनी त्वरित हे आरोप फेटाळून लावले आहेत.
नोटीस विरुद्ध अपील करणार एलआयसी (LIC):
एलआयसी विमा कंपनीने स्टॉक एक्सचेंज फायलिंग मध्ये दिलेल्या माहितीनुसार लवकरच या नोटीस विरोधात ते अपील करणार आहेत. त्यांच्या विरोधात नोटीस जारी झालेली असली (GST Notice To LIC) तरीही ग्राहकांनी याची चिंता करू नये, कारण नोटीसचा कुठलाही विपरीत परिणाम कंपनीच्या आर्थिक परिचालन किंवा इतर कामांवर होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.