High GDP Countries: भारताच्या अर्थव्यवस्थेला मिळाले प्रतिस्पर्धक; मूर्ती लहान असली तरी कीर्ती महान ठरेल का?

High GDP Countries: मागील वर्षी भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक होती आणि हीच वेगवान गती पाहता अनेक देश विदेशातील तज्ञांनी आर्थिक वर्ष 2024 आणि 2025 मध्येही भारताची अर्थव्यवस्था आघाडीवर राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र याचा अर्थ आपल्याला कोणी प्रतिस्पर्धी नाही असा होतो का? तुम्ही असा विचार करत असाल तर ती तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते कारण, जर का आपण लहान देशांचा विचार केला तर यंदा भारतापेक्षा दोन देशांची अर्थव्यवस्था अधिक वेगाने वाढण्याची शक्यता आहे, हे देश म्हणजे मकाऊ आणि नायजर.

भारताला टक्कर देऊ शकणारे हे देश कोणते? (High GDP Countries)

मकाऊ हा चीनचा एक विशेष प्रशासकीय प्रदेश आहे आणि जगातील सर्वात लहान देशांपैकी एक म्हणून ओळखला जातो. मकाऊची अर्थव्यवस्था मुख्यतः कॅसिनो आणि पर्यटनावर आधारित आहे आणि दुसऱ्या बाजूला नायजर हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश असून नायजरची अर्थव्यवस्था मुख्यतः खनिज संपत्तीवर आधारित आहे. मकाऊची GDP 27.2 टक्के आणि नायजरची GDP 11.1 टक्क्यांच्या दराने वाढण्याचा अंदाज आहे. या दोन्ही देशांच्या तुलनेत, भारताची GDP या वर्षी 6.3 टक्के दराने वाढण्याची शक्यता आहे, जी मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये सर्वाधिक म्हणावी लागेल. या दोन्ही देशांशिवाय बांगलादेश, व्हिएतनाम,इंडोनेशिया, चीन यांसारखे अनेक देश GDP च्या बाबतीत प्रतिस्पर्धी बनून वावरत आहेत.

मग कमी वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था कोणाची?

युरोपमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेली जर्मनीची अर्थव्यवस्था यावर्षी 0.9 टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे. शिवाय ऑस्ट्रियाची अर्थव्यवस्था 0.8 टक्के दराने तर इटलीची अर्थव्यवस्था 0.7 टक्के दराने वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातो. सर्वात महत्वाचं म्हणजे युनायटेड किंग्डमची अर्थव्यवस्था यंदा 0.6 टक्के दराने वाढण्याचा अंदाज व्यक्त केला गेलाय. जगभरातील कमी प्रमाणात GDP वाढ दर्शवणाऱ्या देशांमध्ये जापान, फिनलैंड, रूस, नीदरलैंड्स, ऑस्ट्रेलिया, फ्रांस, डेनमार्क, अमेरिका यांचा देखील समावेश होतो.