High Value Cash Transaction Limits: आताच्या घडीला आपल्यापैकी अनेक जण कॅशलेस बनलो आहेत. कॅशलेस म्हणजे काय? तर आपण आता हातात पैसे घेऊन आपण कुठलाही आर्थिक व्यवहार करत नाही. टेक्नॉलॉजी मध्ये झालेल्या क्रांतीमुळे दिवसेंदिवस इंटरनेटच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या पेमेंट ची संख्या वाढत आहे. मात्र तरी देखील कानाकोपऱ्यात अशी अनेक माणसं अशी देखील आहेत जी आजही कॅश देऊन व्यवहार करणं पसंत करतात. यात काही मंडळी अशी ही सापडतील जी आयकर विभागाची नजर चुकवण्यासाठी पैसे देऊन व्यवहार पूर्ण करतात. तुम्ही सुद्धा यापैकीच एक असाल तर आजचे ही बातमी सविस्तर वाचा, कारण कर चुकवण्यासाठी आपल्याकडून करण्यात आलेली एक छोटीशी चूक मोठं आर्थिक नुकसान करू शकते. तसेच ही चूक आयकर विभागाच्या नजरेस आल्यास तुमच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. लक्षात असू द्या की आता आयकर विभागाने उच्च मूल्यांच्या रोख व्यवहारांवर लक्ष केंद्रित केले आहे, त्यामुळे आपण सावधानगिरी बाळगत व्यवहार केले पाहिजे.
आजही कॅश देऊन व्यवहार करता का? (High Value Cash Transaction Limits)
आपल्या देशात बऱ्याच प्रमाणात यूपीआय (UPI) चा वापर करून आर्थिक व्यवहार होत असले तरीही अनेकजण आजच्या घडीला देखील रोख रक्कम देऊनच व्यवहार करणे सोयीस्कर मानतात. तुम्ही देखील यापैकीच एक असाल तर आयकर विभागाकडून सादर करण्यात आलेल्या पाच महत्त्वाच्या उच्च मूल्यांच्या व्यवहाराची माहिती तुम्हाला असले पाहिजे. कारण असे न झाल्यास एक छोटीशी चूक देखील तुम्हाला भरपूर महागात पडू शकते. याविषयीची माहिती आयकर विभागाला मिळाल्यास ते सरळ तुमच्याविरुद्ध नोटीस बजावतील. आज आम्ही तुम्हाला आयकर विभागाच्या याच पाच उच्च मूल्यांच्या रोख व्यवहारांबद्दल माहिती देणार आहोत, या संबंधित जर का तुम्ही अजून पर्यंत विभागाला माहिती पोहोचवली नसेल तर आयकर विभाग नोटीस बजावून तुमची चौकशी करू शकतो. देशात वाढलेल्या काळ्या पैशांचा व्यवहारावर रोख घालण्यासाठी आयकर विभागाने काही नियम बदलले आहेत.
१) बँक खात्यात रोख जमा करणे:
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स यांच्या नियमानुसार एका आर्थिक वर्षात जर का तुमच्याकडून बँक अकाउंट मध्ये दहा लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा केली गेली तर त्वरित याची माहिती आयकर विभागाला पोहोचली पाहिजे. कारण असे न केल्यास ही रक्कम काळा पैसा म्हणून गृहीत धरले जाऊ शकते आणि त्यानंतर हा पैसा कुठून आला याची चौकशी आयकर विभागाकडून केली जाईल.
२) मुदत ठेवीत रोख जमा करणे:
बँक मध्ये गुंतवणूक करीत असताना जर का तुम्ही एफडी( FD) किंवा इतर ठिकाणी एका आर्थिक वर्षात दहा लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केली असेल तर त्वरित आयकर विभाग याकडे लक्ष केंद्रित करेल. तुमच्याकडून जमा करण्यात आलेली ही रक्कम चुकीच्या मार्गाने जमा करण्यात आली आहे, अशी माहिती आयकर विभागाला मिळाल्यास याबद्दल चौकशी सुरू करण्यात येईल.
३) अधिक मालमत्तेचा व्यवहार:
जर का तुम्ही तीस लाख रुपयांपेक्षा अधिक रुपये खर्च करून मालमत्तेची खरेदी रोख रक्कम देऊन केलेली असेल तर याबद्दल आयकर विभागात त्वरित माहिती द्या. कारण असे न केल्यास एवढा मोठा व्यवहार तुम्ही कसा काय केला याबद्दल आयकर विभाग चौकशी करू शकतो (High Value Cash Transaction Limits).
४) क्रेडिट कार्डचे बिल भरणे:
इतर घटकांप्रमाणे क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी सुद्धा जर का तुम्ही दहा लाख रुपयांच्यावर रोख रक्कम देऊन व्यवहार केला असेल तर आयकर विभाग त्वरित तुमच्या पैशांच्या स्त्रोताबद्दल चौकशी करेल.
५) शेअर्स, म्युचल फंड आणि बॉण्ड्स खरेदी:
आजकाल अनेकजणं शेअर्स, म्युचल फंड विकत घेऊन गुंतवणूक करत असतात. तुम्ही देखील यांपैकी एक असाल तर दहा लाख रुपये किंवा त्याहून अधिक व्यवहार करण्यासाठी रोख रकमेचा वापर करू नका किंवा असे केल्यास त्याची माहिती त्वरित आयकर विभागाला पोहोचवा.