IMF Help To Pakistan : आपला शेजारी देश म्हणजेच पाकिस्तान हा नेहमीच त्यांच्या कमजोर अर्थव्यवस्थेसाठी ओळखला जातो. अगदी गरिबीच्या टोकावर लडखळत उभ्या असलेल्या पाकिस्तानला आता मात्र जगभरातील एका मोठ्या संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड (IMF) कडून पाकिस्तानला त्यांची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी 700 दशलक्ष डॉलर्सची मदत करण्यात येणार आहे. रोखीच्या समस्येशी झुंजणाऱ्या या देशाला गरजेच्या वेळी हा निधी मिळाला आहे. पाकिस्तानात देखील येणाऱ्या महिन्यात निवडणुका होतील व निवडणुकांच्या या महत्वपूर्ण काळात सदर रकमेमुळे त्यांना भरपूर फायदा मिळणार आहे. मात्र पाकिस्तानला आर्थिक मदत करणारी ही आंतरराष्ट्रीय संस्था नेमकी आहे तरी काय आणि त्यांनी पाकिस्तानला का मदत देऊ केली आहे हे जाणून घेऊया…
IMF ने केली पाकिस्तानला आर्थिक मदत? (IMF Help To Pakistan)
पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने सांगितले की, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड (IMF)च्या कार्यकारी मंडळासोबतचा पहिला आढावा पूर्ण झाला असून या आर्थिक सुधारणेच्या कार्यक्रमाचा पहिला आढावा पूर्ण केल्यानंतर, IMF ने 3 अब्ज डॉलर्सच्या बेलआउट पॅकेज अंतर्गत 700 दशलक्ष्य डॉलर्सच्या कर्जाला मंजुरी दिली आहे. 11 जानेवारी रोजी वॉशिंग्टन येथे IMF च्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीत पाकिस्तानला 3 अब्ज अमेरिकन डॉलर्स स्टेड बाय अरेंजमेंटच्या अंतर्गत 700 दशलक्ष डॉलर्स मदत म्हणून देण्याच्या निर्णयाला मंजुरी मिळाली आहे. (IMF Help To Pakistan)
तीन दिवस झालेल्या या बैठकीत शेवटच्या दिवशी पाकिस्तानच्या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. IMF च्या मदत कार्यक्रमांतर्गत आत्तापर्यंत पाकिस्तानला 1.2 बिलियन डॉलर्स पहिला हप्ता जुलै 2023 मध्ये देण्यात आला होता. मात्र अद्याप पाकिस्तानला 1.8 अब्ज अमेरिकन डॉलर्स मिळालेले नाहीत. IMF च्या मदत कार्यक्रमाचा एकूण आकडा हा 3 अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे, पैकी पाकिस्तानला राहिलेल्या 1.8 अब्ज अमेरिकन डॉलर्सची मदत लवकरच देण्यात येईल.
पाकिस्तानच्या स्थितीवर जागतिक बँक काय म्हणाली?
जागतिक बँकच्या अनुसार पाकिस्तानची आर्थिक स्थिती ही लाजिरवाणी आहे. बँकने जगासमोर स्पष्टपणे सांगितले की पाकिस्तानचे आर्थिक मॉडेल हे अपयशी ठरलेले आहे. कारण इथे श्रीमंतांना अधिक श्रीमंत करण्यासाठी सर्व धोरणे आखली जातात, म्हणूनच पाकिस्तानमध्ये गरीबी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे जागतिक बँकने म्हटले आहे. पाकिस्तानला लवकरात लवकर आपले धोरण बदलण्याची गरज आहे कारण सध्याच्या धोरणाचा देशाच्या विकासावर विपरीत परिणाम होताना दिसतो. कार्यरत असलेल्या या धोरणाचा पाकिस्तानमधील जनतेला फायदा होत नाही असेही जागतिक बँकचे म्हणणे आहे. हवामान बदलाचा मोठा फटका बसलेल्या पाकिस्तानला जलद गतीने कृषी आणि ऊर्जा क्षेत्रात सुधारणा करण्याची गरज आहे. देशातील छोट्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल अशा योजना पाकिस्तान सरकारने अमलात आणल्या पाहिजेत. जागतिक बँकचे कंट्री डायरेक्टर नाझी बेनहासीन यांच्या म्हणण्यानुसार इतर सहकारी देशांच्या तुलनेत पाकिस्तान अद्याप भरपूर मागे आहे.