बिझनेसनामा ऑनलाईन । आपला शेजारील देश असलेला श्रीलंका प्रचंड आर्थिक संकटात असून भारताने यापूर्वी श्रीलंकेला दिलेले अब्ज डॉलर कर्ज सुविधेचा कालावधी एका वर्षाने वाढवला आहे. भारताने यापूर्वी श्रीलंकेला दिलेल्या या क्रेडिट सुविधेचा पूर्ण वापर झाला नाही, त्यामुळे तिचा कालावधी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे श्रीलंकेला भारताकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तांनी ट्विट केले की, भारत श्रीलंकेशी असलेल्या आपल्या वचनबद्धतेला पुन्हा एकदा जागला आहे. मंत्री शेहानसेमा यांच्या उपस्थितीत आज सुधारित करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामुळे श्रीलंकेला औषध, खाद्यपदार्थ आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी एक अब्ज डॉलर्सच्या क्रेडिट लाइनचा लाभ घेता येईल.
गेल्या वर्षी मार्चमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि श्रीलंका यांच्यात एक अब्ज डॉलर्सच्या कर्ज सुविधेसाठी करार झाला होता. श्रीलंकेत मोठं आर्थिक संकट असतानाच्या काळात भारताने ही सुविधा त्यांना दिली होती. खरं तर भारताने दिलेल्या या कर्ज सुविधेची मूळ मर्यादा मार्च 2024 पर्यंत होती. श्रीलंका सरकारच्या विनंतीवरून ती वाढवण्यात आली आहे. गेल्या वर्षीपासून, श्रीलंकेने क्रेडिट सुविधेचा वापर इंधन, औषधे, खाद्यपदार्थ आणि औद्योगिक कच्चा माल खरेदी करण्यासाठी केला आहे.