Indian Economy : भारतने गाठलाय का 4 ट्रिलियनचा टप्पा? सरकारने केलाय मोठा खुलासा…

Indian Economy : गेल्या अनेक दिवसांपासून आपण भारत देशाच्या अर्थव्यवस्थेने सकारात्मक प्रगती केल्याच्या बातम्या पाहत आहोत. मागच्या काही दिवसांमध्ये तर या संदर्भातील वेगवेगळ्या बातम्यांना ऊत आला होता, देशाचा GDP चार ट्रिलियन डॉलरचा आकडा पार करून पुढे गेल्याची बातमी याचे प्रमुख कारण होती. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांसह अनेक भाजप नेत्यांनी आणि प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनीही मोदी सरकारचे अभिनंदन केले, म्हणूनच सामान्य जनतेला ही बातमी खरी असल्याचा विश्वास वाटू लागला. एवढं घडत असतानाही सरकारच्या वतीने याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली नव्हती, मात्र आता संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत एका प्रश्नाचे उत्तर देताना सरकारने ही बातमी खोटी असल्याची माहिती समोर आली आहे .

4 ट्रिलियनची बातमी सरकारने फेटाळून लावली (Indian Economy):

भारताची अर्थव्यवस्था 4 ट्रिलियनवर पोहोचल्याची बातमी मधल्या काळात सर्वत्र चर्चेत होती. तरीही अनेक दिवसांपासून अर्थ मंत्रालय किंवा भारत सरकारकडून याबद्दल कोणतेही वक्तव्य करण्यात आले नव्हते. देशातील काही नामवंत लोकांनी याला दुजोरा दिल्यामुळे सामान्य लोकांना ही बातमी खरी वाटली ज्यात काहीही गैर नाही. मात्र आता केंद्र सरकारकडून ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे कबूल करण्यात आले आहे, आणि म्हणूनच आता ही बातमी निराधार होती हे स्पष्ट होते. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेतील एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना सरकारने ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याची माहिती दिली आहे.

माकपचे तामिळनाडूतील खासदार एस व्यंकटेशन यांनी अर्थव्यवस्थेबद्दलचा हाच प्रश्न संसदेच्या हिवाळी अधिवेशनात उचलून धरला ज्यावर केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाने उत्तर देताना म्हटले की ‘देशाचा GDP सरकारकडून फक्त भारतीय चलनात म्हणजे स्वरूपात मोजला जातो. आर्थिक वर्ष 2022-23 या काळात देशाचा GDP केवळ 272.41 कोटी एवढा होता.’ चार ट्रिलियन डॉलर्स GDP झाल्याच्या बातम्या बाजारात फिरत असताना केंद्र सरकारकडून पहिल्यांदाच याविषयी (Indian Economy) उघडपणे माहिती देण्यात आली आहे. सरकारच्या ह्या अधिकृत माहितीनुसार अजून आपण चार ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचलेलो नाही, त्यामुळे या संदर्भात फिरणाऱ्या माहितीवर कोणीही विश्वास ठेवू नये.

भाजपच्या मंत्र्यांनी सरकारचे केले होते अभिनंदन:

यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात देशाचा GDP चार ट्रिलियन डॉलरवर पोहोचल्याच्या बातम्या सर्वत्र चर्चेत होत्या. ही माहिती पसरवणारा एक स्क्रीन शॉट सातत्याने सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळे अनेक लोकांनी हीच बातमी खरी मानली होती (Indian Economy). सरकार किंवा अर्थ मंत्रालयाकडून या बातमीला कोणताही दुजोरा देण्यात आला नव्हता, पण ही बातमी पूर्णपणे खोटी आहे असेही वक्तव्य करण्यात आले नव्हते. दरम्यान भाजपच्या काही समर्थकांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केल्यामुळे चार ट्रिलियनची ही बातमी खरी असल्याचा विश्वास जनसामान्याला पटला. या मंत्र्यांमध्ये केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी, जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, आंध्र प्रदेशचे भाजपचे अध्यक्ष डी. पुरंदेश्वरी यांचा समावेश होता.