Indian Economy : गुजरात मध्ये पार पडलेल्या वायब्रंट गुजरात समिटमध्ये अनेक अब्जाधीशांनी वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. यामध्ये मुकेश अंबानी, गौतम अदानी तसेच मारुती सुझुकीचे मालक देखील सहभागी होते. शिवाय या समिटमध्ये उपस्थितांशी चर्चा करताना देशाच्या प्रधानमंत्र्यांनी येणाऱ्या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होऊन ती जगभरातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास व्यक्त केला होता. याच गुजरात समिटमध्ये बोलताना देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील आर्थिक वर्ष 2027-28 पर्यंत भारत 5 ट्रिलियन डॉलर्सचा पल्ला गाठत जगभरातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास व्यक्त केला होता. त्यापुढे त्या असंही म्हणाल्या की वर्ष 2047 पर्यंत भारत 30 ट्रिलियन डॉलरची जीडीपी तयार करेल आणि यानंतर भारताची अर्थव्यवस्था ही एक विकसित अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाईल. लक्षात घ्या की, आत्ताच्या घडीला आपली अर्थव्यवस्था ही 3.4 ट्रिलियन डॉलर्स एवढी आहे, याचाच अर्थ असा की अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी यानंतर भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाचवा क्रमांक आहे.
2047 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था विकसित होईल: (Indian Economy)
गुजरात मध्ये झालेल्या वायब्रंट गुजरात समिट 2024 मध्ये उपस्थितांना संबोधित करताना निर्मला सीतारामन बोलत होत्या. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ष 2047 मध्ये भारत आपल्या स्वतंत्रतेची शंभर वर्ष पूर्ण करेल. स्वतंत्रतेच्या शताब्दी पर्यंतच्या काळाला आपण अमृतकाळ असे म्हणून संबोधतो. याच अमृतकाळात देशांतर्गत विकसित होणाऱ्या क्षेत्रांवर अधिकाधिक भर दिला जाणार आहे. अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षांच्या कार्यकाळात केंद्र सरकारने एफडीआय पॉलिसीच्या अंतर्गत देशात 595 बिलियन डॉलर्सची विदेशी गुंतवणूक करून दाखवली होती.
विकासाच्या मार्गावर असलेले राष्ट्र म्हणून ओळखला जाणारा भारत आत्ताच्या घडीला जगभरातील पाचवी सर्वात मजबूत अर्थव्यवस्था आहे. या परिस्थितीचा अंदाज घेता अर्थमंत्र्यांना वर्ष 2027-28 पर्यंत भारत जगभरातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून नाव कमविल असा विश्वास आहे. जमलेल्या जनसमूहाशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की येणाऱ्या काळात आपल्या भारता GDP 5 ट्रिलियन डॉलर्स पर्यंत नक्कीच पोहोचेल. आणि स्वतंत्रतेला शंभर वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होतानाच भारत 30 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था (Indian Economy) बनण्यात यशस्वी होईल. मधल्या काळात कोविडच्या महामारीमुळे भारताने अनेक कठीण परिस्थितीचा सामना केला होता. अशा गंभीर परिस्थितीतही खचून न जाता पुन्हा एक मजबूत अर्थव्यवस्था तयार करणारा भारत हा नक्कीच एक सक्षम देश आहे.
गुजरात असेल भारताचे इंजिन :
भारताच्या विकासात गुजरात हे राज्य भारताचे इंजन म्हणून कार्य करेल. अर्थमंत्र्यांनी वायब्रंट समिटमध्ये बोलताना माहिती दिली की गुजरातमध्ये देशातील 5 टक्के रहिवासी वास्तव्य करतात व त्यांचं GDP मध्ये 8.5 टक्क्यांचं योगदान आहे. वर्ष 2011 ते 2014 या कार्यकाळात गुजरातने 12 टक्क्यांची वाढ करून दाखवली आहे व म्हणूनच विकसित भारताचे गुजरात हे इंजिन असेल असेही त्या म्हणाल्या. सध्या भारत देश हा सेमीकंडक्टर उत्पादक देश बनणार असून येथे मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहने स्वीकारली जात आहेत.