Indian Economy : 2047 पर्यंत भारत गाठेल 30 ट्रिलिअन डॉलर्सचा पल्ला…

Indian Economy : भारत सध्या प्रगतीच्या मार्गावर चालत आहे. आता जरी आपण विकसनशील देश म्हणून ओळखले जात असलो तरीही येणाऱ्या काळात आपण नक्कीच विकसित राष्ट्र म्हणून ओळखले जाऊ. 2047 पर्यंत भारत 30 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याची अपेक्षा आहे. याबाबत NITI चे CEO बीव्हीआर सुब्रामाण्याम म्हणाले कि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील दोन महिन्यात व्हिजन इंडिया@2047 जाहीर करणार आहेत. आपल्याला वर्ष 2047 पर्यंत जी उदिष्टे गाठायची आहेत, त्यांसाठी उचलावी लागणाऱ्या महत्वाच्या पाऊलांची नोंद यात घेतली जाणार आहे.

काय आहे व्हिजन इंडिया@2047? Indian Economy

भारत सरकार कडून वर्ष 2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचे ध्येय तयार करण्यात आले आहे. यासाठी ते,सर्वसमावेशक आणि पर्यावरणास अनुकूल वाढ, उद्योग आणि शाश्वत पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येईल, तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर विशेष लक्ष दिले जाईल.

सध्या भारत हि जगातली पाचवी मोठी अर्थव्यवस्था (Indian Economy) म्हणून ओळखली जाते. आणि यावर्षी आपण 3.7 ट्रिलिअन डॉलर्सचा आकडा गाठू असा अंदाज व्यक्त केला जात आहे. येत्या 6 ते 7 वर्षात आपण जपान आणि जर्मनीच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकू अशी अपेक्षा आहे. गोल्डमन सॅक्सने आपल्या अहवालात म्हटले आहे की 2075 पर्यंत चीन 57 ट्रिलियन डॉलरसह जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल, तर भारत 52.5 ट्रिलियन डॉलरसह दुसऱ्या स्थानावर असू शकेल.