Indian Export: ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत, यामुळे भारतातून विविध नवीन उत्पादने जगभरात निर्यात केली जात आहेत. भारत सरकार जागतिक बाजारपेठेत देशाचा निर्यात वाटा सातत्याने वाढवण्याचा प्रयत्न करत असून गेल्या आठ वर्षांत 1877 नव्या उत्पादनांची निर्यात सुरू झाली आहे. उत्पादनांसोबतच, निर्यातदारांची संख्या वाढवण्यावरही भर दिला जातोय आणि याच परिणामी कोरोनापूर्वीच्या काळातील निर्यातदारांची संख्या आता पुन्हा गाठली गेली आहे.
भारताच्या निर्यातीचे चित्र बदलतेय: (Indian Export)
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यांचा विचार केल्यास, भारताच्या निर्यातमध्ये सामावलेल्या काही देशांमध्ये वाढ झाली तर काही देशांमध्ये घट झाली आहे. ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर या देशाकडे झालेल्या निर्यातीमध्ये अनुक्रमे 16.19 टक्के आणि 12.81 टक्के वाढ झाली, तर दुसऱ्या बाजूला भारताच्या सर्वात मोठ्या निर्यात बाजारपेठत असलेल्या अमेरिकेकडे झालेल्या निर्यातीमध्ये 4.01 टक्के आणि जर्मनीकडे झालेल्या निर्यातीमध्ये 5.35 टक्के घट झाली आहे.
वाणिज्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जानेवारी दरम्यान चीनमधून आयात केवळ 2.58 टक्क्यांनी वाढली, तर याच कालावधीत रशियामधून आयात 44 टक्क्यांनी वाढली आहे. कोरोनाच्या काळात निर्यातदारांची संख्या घटून 1.51 लाख झाली होती. मात्र आता भारतासाठी चित्र बदलत असून हीच संख्या कोरोनापूर्वच्या तुलनेत वाढली असून 1.63 लाख एवढी झाली आहे. वर्ष 2017-18 मध्ये देशात 1.62 लाख निर्यातदार होते, म्हणजेच आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या PLI आणि इतर योजना आता भारताला निर्यात (Indian Export) वाढवण्यासाठी देखील मदत करत आहेत. आजकाल निर्यात धोरणात नवीन उत्पादनांचा समावेश झाल्याने भारताची निर्यात वाढत आहे.