Indian Trade : जगभरात महागाईचा आकडा कमी होण्याचं नाव घेत नसताना देखील भारताची अर्थव्यवस्था सकारात्मक वाढ करत आहे. अमेरिका, चीन यांसारखे बलाढ्य देश जे काही दिवसांपूर्वी आपले कट्टर स्पर्धक होते ते स्वतःच्या देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी धडपडत आहेत. मात्र भारत हा एक प्रगतिशील देश असून देखील अशा कठीण काळात भक्कमपणे संकटांचा सामना करतोय नव्हे, संकटांना मागे सारत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. अगदी कोविडच्या काळापासूनच आपल्या देशात ‘Vocal For Local’ म्हणजे देशाअंतर्गत काम करणाऱ्या छोट्या-छोट्या व्यवसायांना दुजोरा दिला जातोय. गेल्या दिवाळी आणि चतुर्थीच्या काळात यामुळेच आपल्या बाजारी भांडवलात वाढ झालेली पाहायला मिळाली. तसेच मोठ्याला क्षेत्रांमध्ये देखील भारत दिवसेंदिवस प्रगती करण्याचा प्रयत्न करतोय. भारताचे हे अविरत कष्ट पाहता एक- ना- एक दिवस आपण नक्कीच कुणावरही अवलंबून न राहता स्वावलंबी राष्ट्र बनू यात काहीही शंका वाटत नाही. भारत जगातील अनेक देशांसोबत व्यवहाराच्या नात्याने जोडला गेलाय ज्यात चीन या राष्ट्राचा देखील समावेश होतो, तर आज जाणून घेऊया असे कोणते पाच देश आहेत ज्यांच्या सोबत भारत सर्वाधिक व्यापार करत असतो….
5 सर्वात मोठे देश ज्यांच्या सोबत भारत व्यापार करतो (Indian Trade):
आपला भारत जगातील 192 देशांमध्ये सुमारे 75 हजार वस्तूंची निर्यात करतो. भारत देशाचा चढता क्रम पाहिला आणि अर्थव्यवस्थेत होणारी सकारात्मक वाढ लक्षात घेतली तर वर्ष 2022-23 मध्येच आपला देश 500 डॉलर्सचे लक्ष गाठू शकतो असे तज्ञांचे मत आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारताने 291 अब्ज डॉलर्सची निर्यात संपूर्ण जगात केली होती आणि आता भारताच्या निर्यातीत 45.10 टक्क्यांची वाढ झाली आहे. वर्ष 2022-23 मध्ये भारताने जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था समजली जाणाऱ्या अमेरिकेत एकूण 76.2 अब्ज डॉलर्सची निर्यात केली आहे. एकंदरीत जगभरात असलेल्या आपल्या व्यवसायांपैकी अमेरिकेसोबत होणाऱ्या व्यवसायात 18 टक्क्यांचा सहभाग आहे. यामध्ये भारताने अमेरिकेला 16.2 अब्ज डॉलर्सच्या अभियांत्रिकीच्या वस्तू आणि 11.9 अब्ज डॉलर्सची औषधे तसेच रसायने पोहोचवली आहेत.
अमेरिकेनंतर आपण जर का सर्वात जास्त व्यवहार कोणासोबत करत असू तर ती आहे UAE. United Arab Emirates या अरब देशांच्या समूहासोबत आपण एकूण 28.1 अब्ज डॉलर्सची निर्यात केली आहे (Indian Trade) आणि आर्थिक वर्ष 2020-21च्या तुलनेत वर्ष 2021-22 मध्ये UAE सोबत करण्यात आलेल्या निर्यातीत 69 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. बाकी चीनला जरी आपण सर्वात मोठा शत्रू मानत असलो तरीसुद्धा चीन सोबत आर्थिक व्यवहारांमुळे आपण जोडले गेलेलो आहोत. 2021-22 मध्ये भारत आणि चीनमध्ये एकूण 115.42 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला होता. तर वर्ष 2022-23 मध्ये भारतातून चीनमध्ये वस्तूंची होणारी निर्यात 28 टक्क्यांनी वाढली होती (Indian Trade).
याशिवाय आपण बांगलादेशला तांदूळ आणि गहू यांसारख्या धान्याचा पुरवठा करत असतो. भारताने बांगलादेशला 16.1 अब्ज डॉलरची निर्यात केली आहे. तसेच इतर कृषी उत्पादनांमध्ये आपण बांगलादेशला 5.5 अब्ज डॉलर्सची विक्री केली. सर्वात शेवटी भारत नेदरलँड सोबत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करीत असतो. भारताने नेदरलँड्सला 12.6 अब्ज डॉलरची निर्यात केली आहे, ज्यात 5.3 अब्ज डॉलर किमतीचे पेट्रोलियम, १.८ टक्के अब्ज किमतीची अभियांत्रिकी उत्पादने आणि 1.8 अब्ज किमतीची रसायने यांचा समावेश होतो.