Indian’s Spending: भारतीयांचा सर्वाधिक खर्च खाद्यपदार्थांवर नाही; मग पैसा जातो तरी कुठे?

Indian’s Spending: भारतात नुकत्याच झालेल्या सरकारी सर्वेक्षणातून खर्च करण्याच्या सवयींमध्ये मोठा बदल झाल्याचं उघड झालं आहे. या सर्वेक्षणानुसार, गेल्या 10 वर्षांत भारतीयांच्या कुटुंबाचा खर्च दुपटीने वाढला आहे. पण खास गोष्ट म्हणजे, अन्नावर होणारा खर्च कमी झाला असून लोकं इतर गोष्टींवर पैसे खर्च करण्याला प्राधान्य देतात. आकड्यांच्या नुसार आता लोक खाद्यपदार्थ आणि पेयांवर कमी आणि इतर गोष्टींवर जास्त खर्च करत आहेत.

भारतीय नेमका खर्च करतात तरी कुठे? (Indian’s Spending)

भारताच्या सांख्यिकी मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, गेल्या दहा वर्षात भारतीयांचा घरखर्च दुप्पटीपेक्षा जास्त वाढला आहे. या सर्वेक्षणातून हेही लक्षात आले की, आता भारतीय घरांमध्ये अन्नधान्यावरचा खर्च कमी झाला असून दुसरीकडे ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, भारतीय आता कपडे, टेलिव्हिजन आणि मनोरंजनाशी संबंधित वस्तूंवर अधिक खर्च करत आहेत.

गेल्या दहा वर्षांचा सर्वेक्षण अहवालानुसार ग्रामीण भागात लोकांच्या महिन्याच्या खर्चात जेवण आणि पेयांवर होणारा खर्च कमी झाला आहे. वर्ष 2011-12 च्या तुलनेत तो 53 टक्क्यांवरून आता 46.4 टक्क्यांवर आला आहे. शहरांच्या बाबतीतही असेच चित्र दिसते, तिथेही लोकांच्या खर्चात अन्नाचा वाटा 42.6 टक्क्यांवरून 39.2 टक्क्यांवर कमी झाला आहे. घरांवरी खर्चाची माहिती गोळा करण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, भारतीयांच्या एकूण खर्चात खाद्यपदार्थांचा वाटा कमी झाला असून प्रवास आणि इतर गोष्टींवर होणारा खर्च वाढला आहे (Indian’s Spending). ही ग्राहक सर्वेक्षण खूप महत्वाची ठरते, कारण यातूनच अर्थव्यवस्थेतील मागणीमधील बदलांची माहिती मिळते आणि पुढे या माहितीचा वापर सरकार किरकोळ महागाई तसेच सकल राष्ट्रीय उत्पादन (GDP) ची गणना करण्यासाठी करते.